Join us

coronavirus : केंद्रीय चमूच्या हवाल्याने दिलेली रुग्णसंख्या चुकीची, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 9:26 PM

रुग्णसंख्येतील लाखोंच्या वाढीबद्दल केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

मुंबई -  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना (कोविड १९) च्या रुग्णांची आकडेवारी ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांमध्ये पोहोचेल  अशा आशयाच्या बातम्या बुधवारी माध्यमातून  केंद्रीय चमूच्या हवाल्याने प्रकाशित झाल्या  आहेत. रुग्णसंख्येतील लाखोंच्या वाढीबद्दल केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

केंद्रीय चमूने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान माननीय  महापालिका आयुक्त यांच्यासह महापालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थिती आणि त्या अनुषंगाने महापालिका करीत असलेल्या उपाययोजना याविषयीची माहिती घेतली, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले.

संबंधित केंद्रीय चमूने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक व वैद्यकीय उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलेले आहे. त्याचबरोबर विविध माध्यमांमध्ये ज्या प्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित झाली आहे, तशा प्रकारचे कोणतेही प्रत्यक्ष वा सूचक वक्तव्य  चमूने  महापालिका आयुक्तांकडे किंवा अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे अथवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केले नाही. विविध माध्यमातील या बातम्या  वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या असून अतिरंजित व दिशाभूल करणाऱ्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आकडेवारी लक्षात घेतल्यास 'कोरोना आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण व वाढीचे प्रमाण आटोक्यात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आवश्यक ती सर्व कार्यवाही काटेकोरपणे अमलात आणली जात आहे. ज्यामुळे संसर्गास प्रतिबंध होण्यास देखील मोठी मदत होत आहे.

८० टक्क्यांपेक्षा रुग्णांची प्रकृती स्थिर

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कोरोना' विषयक आकडेवारी लक्षात घेता ११ ते २१ मार्च २०२० यादरम्यान बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ३ हजार ४४५ व्यक्तींना या रोगाची बाधा झालेली असून यापैकी ४२५ पेक्षा अधिक रुग्ण आजवर बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधोपचार करण्यात आले, ही बाब या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायला हवी. तसेच २ हजार ८८२ रुग्ण सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना धोका नाही.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई