राहा सावधान... बेफिकीरीची मानसिकता करेल घात ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 09:01 AM2022-06-05T09:01:58+5:302022-06-05T09:02:35+5:30

coronavirus : कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिशाहीन उपचारांपासून ते आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रेचा प्रवास अत्यंत खडतर होता. परंतु, अजूनही आरोग्याविषयी संकटाविषयीच्या लोकसाक्षरतेचा समाजात अभाव दिसून येतो. 

coronavirus in maharashtra : Be careful ... the mindset of carelessness will do harm! | राहा सावधान... बेफिकीरीची मानसिकता करेल घात ! 

राहा सावधान... बेफिकीरीची मानसिकता करेल घात ! 

Next

- स्नेहा मोरे 

सलग दोन वर्षे कोरोनाच्या तीन लाटांचा उद्रेक सहन केल्यानंतर आता नियंत्रणात आलेला डोळ्यांना न दिसणारा विषाणू पुन्हा एकदा हातपाय पसरतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिशाहीन उपचारांपासून ते आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रेचा प्रवास अत्यंत खडतर होता. परंतु, अजूनही आरोग्याविषयी संकटाविषयीच्या लोकसाक्षरतेचा समाजात अभाव दिसून येतो. 

वाढत्या संसर्गासह कोरोनाची चौथी लाट दारात आली असताना कोरोना गेला या समजुतीत राहण्याची मानसिकता सामान्यांना निश्चितच घातक ठरेल. त्यामुळे या कोरोना संसर्गाच्या चढ-उताराबद्दल वेळीच सावधानता बाळगून खबरदारी घेतली पाहिजे.
एखाद्या महासाथीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जगाची कितपत तयारी आहे, संकटग्रस्त देशांना परस्पर सहकार्य करण्यात कोण किती सक्षम आहे, तसेच या सर्व मुद्द्यांवर सर्वांनाच आलेले अपयश या सगळ्याची ही परीक्षा कोरोना काळात अनुभवली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जगभरात सारे काही आलबेल होते, अशातला भाग नाही. परंतु, कोरोनाने प्रत्येक देशाच्या प्राथमिकता बदलल्या हे मात्र खरे. परिणामी, आता तरी प्रत्येक देशासह राज्याने आरोग्यविषयक संकट आणि आव्हानांसाठी सज्ज झाले पाहिजे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर हा विषाणू आता गेला या आविर्भावात असणाऱ्या सामान्यांनी दुसऱ्या लाटेचे कटू अनुभव आठवावेत.

या अनुभवानंतर तरी आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या वर्धक मात्रेच्या लसीकरणाकडे पाठ न फिरवता सर्व वयोगटातील लाभार्थ्यांनी लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. त्याचप्रमाणे, स्वतःसह इतरांच्या आरोग्याचा विचार करून सार्वजनिक स्थळांवर तसेच गर्दीचा वावर असणाऱ्या ठिकाणी मास्क परिधान करावा. तसेच, शारीरिक अंतर आणि स्वच्छतेचे निकष पाळण्यावर भर द्यावा. भविष्यातील सुदृढ आरोग्याच्या दृष्टिकोनातून छोट्या सवयी अंगीकारणे फायदेशीर ठरेल हे निश्चित. 

कोरोनाच्या प्रदीर्घ अशा दोन वर्षांच्या कालावधीनंतरही मास्क घालण्यास टाळाटाळ करणाऱ्या सामान्यांनी प्रदूषणाच्या पातळीचाही गांभीर्याने विचार करावा. वायुप्रदूषण, वाढत्या धूलिकणांमुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठीही मास्क हा उत्तम पर्याय आहे. शिवाय, नाक व घशाच्या अन्य संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. 

त्रिसूत्रींसह संतुलित आहार, योग्य जीवनशैली अंगीकारायला हवी

-    सुरुवातीच्या काळात कोरोनाग्रस्त झालेल्या प्रत्येक देशाला आपल्यापुढील सर्व समस्या, अडचणी, आव्हाने यांना बाजूला सारून कोरोनावर लक्ष केंद्रित करावे लागले.
-    कोरोना जेव्हा इतर देशांमध्ये झपाट्याने पसरत होता, त्यावेळी हा आजार आपल्यापर्यंत येणारच नाही, त्याची लागण होणारच नाही, अशा भ्रमात काही जण होते. परंतु, कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आणि मृत्युदरही वाढायला लागला. 
-    त्यावेळी या गाफील देशांचे डोळे उघडले आणि त्यांनी तातडीच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे संकट गडद होते आहे, त्याची तीव्रता यावेळी किती असेल हे आताच सांगणे अवघड असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.
-    चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना सामान्यांनीच कोरोनाला धडा शिकविण्यासाठी आरोग्यविषयक आव्हानांचे गांभीर्य ओळखले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कोरोनाच्या त्रिसूत्रींसह संतुलित आहार, योग्य जीवनशैली अंगीकारली पाहिजे.

Web Title: coronavirus in maharashtra : Be careful ... the mindset of carelessness will do harm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.