Coronavirus: अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वाढ, लस घेतल्यानंतर चाचणी करण्याकडे लाभार्थ्यांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:17 AM2021-05-25T10:17:20+5:302021-05-25T10:17:45+5:30
Coronavirus in Maharashtra: मागील काही महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी ही चाचणी करण्याला प्राधान्य देत होते. मात्र आता खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये सामान्य नागरिकांचीही गर्दी दिसते आहे.
मुंबई : कोरोनाच्या मागील लाटेच्या तुलनेत सध्या लस घेतल्यानंतर प्रोटीन अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. लस घेतल्यानंतर शरीरात रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होते, याची पडताळणी कऱण्यासाठी बऱ्याच लाभार्थ्यांकडून खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी करण्यासाठी रीघ लागली असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी ही चाचणी करण्याला प्राधान्य देत होते. मात्र आता खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये सामान्य नागरिकांचीही गर्दी दिसते आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, लसीकरणानंतर अशा कोणत्याही चाचण्यांची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.
खासगी प्रयोगशाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाच्या प्रक्रियेत सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी या चाचण्यांना उत्तम प्रतिसाद दिला. मात्र सामान्य नागरिकांसाठी लसीकरण प्रक्रिया खुली केल्यानंतर सामान्यांचा या चाचणीला चांगला प्रतिसाद आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान चाचण्यांचे प्रमाण तिप्पटीने वाढले आहे. दुसऱ्या डोसनंतर १५ दिवसांनी ही चाचणी करण्यात येते, त्यानंतर शरीरात रोगप्रतिकारक शक्तीची पातळी किती आहे हे समजते. याविषयी, राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, सध्या देण्यात येणाऱ्या लसी या ड्रग कंट्रोलर जनरल आफ इंडियाच्या वतीने प्रमाणित करण्यात आल्या आहेत, शिवाय त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्सही झाल्या आहेत. त्यामुळे लसीकऱणानंतर वैद्यकीय मार्गदर्शनानुसार, या चाचणीची आवश्यकता नाही.
गेल्यावर्षी संसर्ग पडताळणीच्या चाचणीत वाढ
-गेल्या वर्षीही बऱ्याच सामान्य नागरिकांकडून आयजीजी अँटीबॅडी चाचण्या करण्याकडे अधिक कल होता.
- या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे का हे पडताळण्यात येत होते.
- एका खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी दिवसाला २ हजार ४०० चाचण्या करण्यात येत होत्या,
- मात्र जानेवारी हे प्रमाण कमी होऊन हजार चाचण्यांवर आले तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे प्रमाण एप्रिलमध्ये दिवसाला चार हजार इतके वाढलेले दिसून आले.
कच्चा माल नसल्याने म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनची वानवा
काळ्या बुरशीचे रुग्ण वाढत आहेत. सुमारे पाच राज्यांत या आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यात महाराष्ट्रातील रुग्णांची वाढ होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले की, हे इंजेक्शन ३१ मेनंतर मिळू शकते. तोपर्यंत केंद्राकडे मागणी केली आहे. मात्र, अँपिटॉरेंसीन बीच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा मालच नसल्याने या इंजेक्शनची राज्यात वानवा आहे.
nगंभीर रुग्णांना पुरविण्यात आलेला ऑक्सिजन दर्जाहीन असल्याने काळ्या बुरशीचा आजार पसरला असल्याचा आरोप होत आहे. ऑक्सिजन गुणवत्तेची तपासणी व्हावी, अशी मागणी देखील होत आहे. खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाइकांकडे मागणी केली जात आहे.
काळी बुरशी रोगाचे कारण दूषित ऑक्सिजन पुरवठा ?
काळ्या बुरशीचा आजार साथरोग नियमावलीत घेण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्णवाढ वाढली असताना अशा रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने इंडस्ट्रियल ऑक्सिजन उत्पादकांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे सांगण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करण्यात आली. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीत गुणवत्ता राहिली नसावी.
आतापर्यंत राज्यात १८ ते ४४ वयोगटातील , सात लाखांहून अधिकजणांना लस
मुंबई : राज्यात रविवारी ४० हजार ७८१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत राज्यात एकूण २ कोटी ७ लाख ९४ हजार ४३७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सात लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात मुंबई आघाडीवर असून ९३ हजार ५६४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. , ठाणे ६८ हजार ११५, पुणे ५४ हजार ६९०, रत्नागिरीत २६ हजार ३५, रायगडमध्ये २५ हजार १९९, तर यवतमाळमध्ये २३ हजार ६११ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.