मुंबई : मुंबईतील कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येताना दिसत असले, तरी मुंबईनजीकच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर येथे तात्पुरत्या कोविड केंद्रांची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काही आठवड्यांत या ठिकाणी एकूण ५ हजार खाटांची क्षमता असलेली केंद्र उभारण्यात येतील.पालिका प्रशासन आणि खासगी वैद्यकीय तज्ज्ञ असलेले डॉ. मुफ्फजल लकडावाला आणि डॉ. राजेश डेरे यांनी मिळून शहर, उपनगरात कोविड केंद्र सुरू केली आहेत. येथे आॅक्सिजनची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच ठाणे येथे १ हजार ८०० खाटांची दोन केंद्रे, नवी मुंबईत १ हजार २०० खाटांची तीन केंदे्र, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर येथे प्रत्येकी ५०० खाटांची क्षमता असलेली केंद्रे उभारण्यात येतील.याबाबत डॉ. मुफ्फजल लकडावाला म्हणाले, वरळी येथे एनएससीआय येथे अवघे १२ डॉक्टर आणि ३० परिचारिकांना घेऊन केंद्र सुरू केले आहे. अन्य परिक्षेत्रांतही तीन पालिकांशी बोलून कोविड केंद्र उभारण्यासाठी चर्चा सुरू आहे. या यंत्रणांना संपर्कविरहित क्युबिक्सच्या एक्स रेची सुविधा असणारे केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, त्यात सीसीटीव्हीची सक्षम यंत्रणा असावी, असे सूचित करण्यात आले आहे.वेगाने नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या परिक्षेत्रांतून ५० टक्के नागरिक अत्यावश्यक सेवेकरिता प्रवास करतात. त्यामुळे या माध्यमातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक आहे. या परिक्षेत्रातील संबंधित स्थानिक यंत्रणांच्या मदतीने येथील संसर्गावर वेगाने नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तात्पुरत्या कोविड केंद्रांच्या उभारणीसाठी अभियंते आणि संबंधित तज्ज्ञांकडून काम सुरू झाले असून, येथील रुग्णालय नॉनकोविड रुग्णांसाठीही राखीव ठेवण्यात येणार आहे.
coronavirus: मुंबईनजीक क्षेत्रात बेडची उपलब्धता वाढवणार, तात्पुरत्या केंद्रांच्या उभारणीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 6:39 AM