coronavirus: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा... मंत्रालयातून आदेश सुटले!, मुख्यमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी
By अतुल कुलकर्णी | Published: September 5, 2020 07:25 AM2020-09-05T07:25:33+5:302020-09-05T07:33:41+5:30
एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, हाय रिस्कमधील रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्ण शोधा. एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले. तुम्ही काय करणार आहात याचे नियोजन मला द्या, असेही त्यांनी बजावल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
या आदेशानंतर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवान बैठका घेतल्या. त्यावेळी अनेक ठिकाणी नोंदणीच केली जात नसल्याचेही समोर आले. अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यात ताळमेळ नाही. तर काही ठिकाणी आकडेवारी आॅनलाईन भरण्याचे आदेश असताना ती भरलीच जात नाही, असेही एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले. आम्ही मागे लागून थकलो, तुम्ही बातमी दिली बरे झाले, आता तरी सुस्तावलेले अधिकारी कामाला लागतील, अशी प्रतिक्रीया आरोग्य विभागातील एका अधिकाºयाने दिली. तर अनेक जिल्हाधिकाºयांनी आमच्यासोबत राज्याचे आरोग्य सचिव बोलतच नाही, अशा तक्रारी केल्याची माहिती काही पालकमंत्र्यांनी केली. आरोग्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सवर बोलावे, अशी मागणी करुनही त्यांनी आमच्याशी संवाद साधला नसल्याचे काही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यात डाटा आॅनलाईन भरलेला नाही. त्यामुळे प्रमाण कमी दिसत असेल. एंट्री करणे बाकी आहे, अशी माहिती स्वत: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. आम्ही एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान २० ते २५ जणांची तपासणी केली असा दावा त्यांनी केला.
आमच्या प्रतिनिधींनी कळवलेली माहिती
कोल्हापूरहून
समिर देशपांडे
कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजार पॉझिटिव्ह रुग्णांचा डाटा भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी झाली की नाही हेच समोर आलेले नाही असे सांगण्यात आले आहे.
सोलापूरहून
शितलकुमार कांबळे
शहरात एका रुग्णाच्या मागे ८ जणांची तपासणी करण्यात येत आहे. स्लमपेक्षा उच्चभ्रू वसाहतीत रुग्ण अधिक सापडत आहेत. तेथील रुग्णांचा कमी जणांशी संपर्क येतो. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी आहे असे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांनी सांगितले. सोलापूर शहर वगळता जिल्ह्यामध्ये एका रुग्णामध्ये १५ व्यक्तींची तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.
औरंगाबादहून
संतोष हिरेमठ
सर्व लोकांची माहिती पोर्टलवर भरण्यास वेळ लागतो. त्यासाठी अधिकचे कर्मचारी नियुक्त करून डाटा भरण्याचे काम केले जात आहे. परंतु रोजची संख्या अधिक असल्याने त्यास वेळ लागतो. एका रुग्णाच्या संपर्कातील लोकांची माहिती भरण्यास दोन ते तीन दिवस जातात. त्यात नव्या रुग्णांची भर पडत असते. डाटा न भरल्यामुळे निष्कर्ष चुकू शकतात. पण राज्यभरात हीच परिस्थिती आहे. डाटा भरला गेला नाही, म्हणजे लोकांची तपासणी केली नाही, असे नाही. असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या.