Join us

Coronavirus: ८ दिवसांत अचानक कोरोना रुग्णसंख्येत तिप्पटीनं वाढ; मुंबईत सतर्कता, डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 3:50 PM

राज्यात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत ५२ टक्के वाढ झाली आहे. तर मुंबईत ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे

मुंबई - राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीवरून पुन्हा भयावह चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत बुधवारी कोरोना व्हायरसचे ७३९ रुग्ण आढळले आहेत. जे मागील ४ फेब्रुवारीपासून एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोविडचे १ हजाराहून जास्त रुग्ण झाले आहेत. 

राज्यात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत ५२ टक्के वाढ झाली आहे. तर मुंबईत ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याआधी ४ फेब्रुवारीला शहरात ८४६ रुग्ण आढळले होते. दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनानेही सतर्कता बाळगली आहे. बीएमसीनं युद्धस्तरावर कोरोना चाचणी करण्यात वाढ केली आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे ७३९ नवीन रुग्ण आढळले. 

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. शहरात सध्या २ हजार ९७० सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे एकूण १० लाख ६६ हजार ५४१ रुग्ण सापडले. तर त्यातील १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत धारावीच्या झोपडपट्टीत बुधवारी कोविड १९ चे १० नवीन रुग्ण आढळले. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, धारावी १० रुग्ण आढळल्याने सक्रीय रुग्ण संख्या ३७ वर पोहचली आहे. १५ मे नंतर रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. धारावीत आतापर्यंत ४१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ २५ मे - २१८२६ मे - ३५०२७ मे - ३५२२८ मे - ३३०२९ मे - ३७५३० मे - ३१८३१ मे - ५०६ १ जून - ७३९ 

कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ का?महाराष्ट्रात अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. रुग्णसंख्येत घट झाल्यानं लोकांची आवाजावी वाढली. सार्वजनिक ठिकाणी लोक एकमेकांना भेटताना पूर्वीप्रमाणे कोरोना नियमावलीचं पालन करताना दिसत नाहीत. अनेक ठिकाणी विनामास्क लोक फिरत आहेत. त्याचसोबत ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट BA4 आणि BA5 संक्रमणदेखील जबाबदार आहेत. 

मुंबईत कोरोनाची छुपी लाटराज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, मुंबईत ट्रेंड ग्राफ छुपी कोविड लाट दिसते. जी Omicron च्या सौम्य व्हेरिएंटमुळे असू शकते. याला चौथी लाट म्हणणं घाईचे ठरेल. मात्र त्यात वाढ होताना दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. कमकुवत लोकांचं संरक्षण करणे, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचं आहे. घाबरण्याची गरज नाही परंतु सतर्क राहाणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या