Join us

Coronavirus: राज्यात रुग्णवाढ, त्यात लक्षणविरहित रुग्ण अधिक; लवकर निदान करण्यावर भर देण्याची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 7:33 AM

मुंबईतील जम्बो कोविड केंद्रांमध्येही फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत रुग्णसंख्या कमी झालेली दिसून आली होती, मात्र १६ फेब्रुवारीनंतर रुग्णवाढीचे प्रमाण चौपटीने वाढल्याची माहिती कोविड केंद्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचा संसर्गाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. परिणामी, एका बाजूला दैनंदिन वाढत असले तरीही लक्षणविरहित रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे रुग्णांचे लवकर निदान करण्यावर अधिक भर देण्याची गरज असून त्यांना उपचार प्रक्रियेत आणण्याची गरज आहे.

मुंबईतील जम्बो कोविड केंद्रांमध्येही फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत रुग्णसंख्या कमी झालेली दिसून आली होती, मात्र १६ फेब्रुवारीनंतर रुग्णवाढीचे प्रमाण चौपटीने वाढल्याची माहिती कोविड केंद्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढीच प्रमाण अधिक असले तरी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अजूनही खाटांची उपलब्धता असल्याची माहिती पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. शहरात अजूनही ४० टक्के अतिदक्षता विभागातील खाटा आणि ५२ टक्के आक्सिजनक्षमता असलेल्या खाटा रिक्त असून ५३ टक्के खाटा आरक्षित आहेत अशी माहिती पालिकेच्या आऱोग्य विभागाने दिली आहे.

राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, सध्या राज्यात पसरत असलेली कोरोनाची दुसरी लाट हा कोरोनाचा नवा स्ट्रेन असण्याची शक्यता आहे याविषयी संशोधन अभ्यास सुरु आहे. मात्र हा विषाणू वेगाने पसरत असला तरीही लक्षणविरहित रुग्णसंख्या अधिक आहे. राज्यातील १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान साप्ताहिक मृत्यूदर हा ०.७ टक्के होता, मात्र रुग्णवाढीनंतर १५ ते २० मार्चदरम्यान याचे प्रमाण ०.३२ टक्क्यांवर पोहोचले. तर सध्या आठवड्यातील दैनंदिन रुग्णसंख्या तिप्पट झाली आहे. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ३६ हजार ६०६ रुग्ण तर २५९ मृत्यूंची नोंद होती. १५ ते २० मार्चदरम्यान १ लाख ३४ हजार रुग्ण आणि ४३९ रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी, विविध पातळ्यांवर संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्नशील असून शोध, चाचण्या, निदान व उपचार यावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे.

काेराेनाच्या नव्या स्ट्रेनबाबत संशाेधन सध्या राज्यात पसरत असलेली कोरोनाची दुसरी लाट हा कोरोनाचा नवा स्ट्रेन असण्याची शक्यता आहे याविषयी संशोधन अभ्यास सुरु आहे. मात्र हा विषाणू वेगाने पसरत असला तरीही लक्षणविरहित रुग्णसंख्या अधिक आहे. - डॉ. राहुल पंडित, राज्य टास्क फोर्स 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या