मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३४६ पर्यंत पोहचली आहे. यामध्ये मुंबईत ५० टक्के म्हणजे ७४६ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोनाचा फैलाव राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात जर कोरोना पसरला तर मोठा अनर्थ होण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर राज्य सरकारनं कडक पावलं उचलली आहे. राज्यात कोरोनामुळे दिवसभरात २५ लोकांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतांचा आकडा ९७ वर पोहचला आहे.
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली की, मुंबईतील वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी मुंबईत एसआरपीएफ पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील दाटवस्तीच्या परिसरात एसआरपीएफ तैनात करण्यात येणार आहे. मुंबई पोलिस ड्रोनच्या सहाय्याने लोकांवर करडी नजर ठेवणार आहे. कुठेही लोकांची गर्दी होऊ नये यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच सार्वजनिक शौचालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्याठिकाणी सॅनिटायझेनशन वारंवार करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे अग्निशमन दलाची गाडी त्याठिकाणी उभी करुन त्या माध्यमातून तासातासाला सॅनिटायझेशन केले जाणार आहे. तसेच दाट लोकवस्तीत ड्रोनच्या माध्यमातूनही सॅनिटायझेशन केले जाणार आहे. कम्यूनिटी किचनमार्फत होम टू होम डिलिव्हरी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गरजू लोकांना जेवण्याची सोय होत नाही त्यांना घरी जेवणाची व्यवस्था करणार आहोत. अनेक लोक रोडवर आसरा घेत आहेत. अनेकजण लहान रुममध्ये वास्तव करत असल्याने त्यांना बंद रुमची व्यवस्था करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.
त्याचसोबत मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या उपाययोजना करणे गरजेचं आहे. सॅनिटायझेशन टनेलबाबतही निर्णय घेणार आहोत. रॅपिड टेस्टद्वारे जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. ते सुरु झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांचे प्राधान्याने तपासणी करुन घेऊ असं राजेश टोपेंनी सांगितले.
दरम्यान, मुंबई महापालिका रुग्णालयातील पाच आणि आठ खासगी प्रयोगशाळांमध्ये १४ हजार कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ९ हजार चाचण्या मागील सात दिवसांत केल्या आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाची वैद्यकीय तपासणी, चाचणी आणि उपचाराची सुविधा केवळ पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपलब्ध होती. मात्र रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेत तपासणीची सुविधा पालिकेच्या पाच तर आठ खासगी प्रयोगशाळांमध्ये सुरू करण्यात आली.पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविका घरोघरी जाऊन करोनाची लक्षणे आढळणाऱ्यांचा शोध घेत आहेत. लक्षणे आढळताच संबंधित व्यक्तीची करोनाविषयक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये १४ हजार करोना संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.