Coronavirus: वांद्रे पूर्व, वडाळ्यामध्ये बाधित १०८ दिवसांनी होतात दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:48 AM2020-06-28T03:48:24+5:302020-06-28T03:48:35+5:30
आठ विभागांमध्ये कालावधी ५० दिवस । रुग्णसंख्या शून्यावर आणण्याचा पालिकेचा निर्धार
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महापालिकेने मोठी झेप घेतली आहे. एच पूर्व (वांद्रे पूर्व) आणि एफ उत्तर (वडाळा, माटुंगा) या हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १०८ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच आठ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवसांहून अधिक आहे. तर मिशन झिरोअंतर्गत रुग्णसंख्या शून्यावर आणण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मुंबईत मार्च महिन्यात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी तीन दिवसांचा होता. हा कालावधी २० दिवसांवर नेण्यासाठी राज्य शासन आणि पालिका प्रशासनाने ८ मे रोजी आठ संधी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच धारावी, वरळीसारख्या झोपडपट्टी भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी, संस्थात्मक अलगीकरण आणि तात्काळ उपचार अशी मोहीम हाती घेण्यात आली. याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यानी आणलेल्या ‘चेज द वायरस' याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १५ व्यक्तींचे अलगीकरण करण्यास सुरुवात झाली. प्रतिबंधित क्षेत्रातही नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागवत नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. यामुळे मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ४१ दिवसांवर आला आहे. ‘एच पूर्व’ व ‘एफ उत्तर’ या दोन प्रशासकीय विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने नुकताच १०८ दिवसांचा टप्पा गाठत शतकपूर्ती केली आहे.
२४ विभांगामध्ये वॉररूम
कोविडचा अधिक धोका संभवतो अशा गटातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी विविध परिसरांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, मधुमेह असलेले नागरिक, रक्तदाबाचा-हृदयविकाराचा त्रास असणारे नागरिक इत्यादी ‘को मॉर्बीड’ गटातील नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहेत. २४ प्रशासकीय विभागांमध्ये ‘वॉररूम’ सुरू करण्यात आल्या आहेत. येथील डॅशबोर्डवर मुंबईतील सर्व कोविड खाटांची उपलब्धता अद्ययावत होत असते.
पोलिसांच्या सहकार्याने कंटेनमेंट झोनवर लक्ष
बाधित क्षेत्रात नियमितपणे जागृती करणे, नागरिकांना त्यांच्या परिसरात बाहेर पडण्याची गरज भासू नये यासाठी सर्व दक्षता घेणे, जीवनावश्यक बाबींची उपलब्धता त्याच परिसरात करून देण्याची कार्यवाही याची परिणामकारक अंमलबजावणी पोलिसांच्या सहकार्याने पालिका करीत आहे.