CoronaVirus शिवाजी पार्कातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 06:45 AM2020-04-05T06:45:12+5:302020-04-05T06:45:52+5:30
परिसरात चिंता वाढली । इमारतीत प्रवेश बंद; रहिवाशांचीही चाचणी
मुंबई : शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे उजेडात आले आहे. कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या इमारतीमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. या आजाराचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
मुंबईतील मोठ्या मैदानांपैकी एक असलेल्या शिवाजी पार्कमध्ये मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या मैदानावर क्रिकेटपासून सर्व प्रकारचे खेळ खेळले जातात. येथील ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा प्रसिद्ध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मैदाने बंद करण्यात आली आहेत. परंतु, शनिवारी या परिसरातील दिनकर इमारतीमध्ये राहणाºया ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे उजेडात आले. दादर परिसरात राहणाºया ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याने चिंंता व्यक्त होत आहे़
या परिसरात महापालिकेने निर्जंतुकीकरण मोहीम प्रभावी केली आहे. त्याचबरोबर सदर ज्येष्ठ नागरिक राहत असलेल्या इमारतीला सील करण्यात आले आहे. या चार मजली इमारतीमध्ये १५ फ्लॅट असून यामध्ये ३५ जण राहतात. कोरोनाची लागण होण्याचा धोका असलेल्या रहिवाशांचा चाचणी अहवाल येईपर्यंत या इमारतीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
हिंदुजा रुग्णालयात उपचार
कोरोनागस्त ज्येष्ठ नागरिकाला तातडीने हिंंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची पत्नी आणि मुले अशा चार जणांची चाचणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांना वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. या इमारतीमधील अन्य ३० जणांना कोरोना होण्याचा धोका कमी असल्याने त्यांना वेगळे ठेवण्यात आलेले नाही. त्या ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबीयांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत ही इमारत सील करण्यात आली आहे. सदर ज्येष्ठ नागरिकाने परदेशी प्रवास केल्याची नोंद नाही. त्यामुळे कोरोनाची लागण नेमकी कशी झाली? याचा शोध महापालिका घेत आहे.
नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण
आजमितीस शहर उपनगरातील नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात आली आहे. दाट वस्तीतील सर्व अतिसहवासित नागरिकांना लॉज आणि वसतिगृहांमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. मुंबईत सार्वजनिक व खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना (कोविड-१९) च्या एकूण १० हजार चाचण्या केल्या आहेत़