CoronaVirus: मुंबईत सहवासितांमुळे वाढतोय संसर्ग; रुग्णसंख्या अडीच हजारांच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:41 AM2020-04-20T03:41:10+5:302020-04-20T07:16:22+5:30
ठाणे, नवी मुंबईत धोका कायम
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या थेट निम्म्याने कमी झाली असून मृत्यूचा आकडाही दोन अंकावरुन थेट एका अंकावर आला आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना काही दिवसांमध्ये लक्षणे दिसून आल्यावर पुन्हा वाढताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरातील रुग्णांमध्ये मुख्यत्त्वे प्रवासाचा इतिहास नसणाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या रुग्णांच्या चाचण्या प्राधान्याने केल्या गेल्या. यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता थेट संपर्कात आलेल्या व्यक्ती अलग केल्याने प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु अजूनही या भागांमध्ये बाधा झालेले रुग्ण असण्याची शक्यता असून पाचव्या दिवसापासून लक्षणे दिसण्यास सुरुवात होईल. तेव्हा पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा संसर्ग प्रसार कमी झाला, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सहवासितांच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर शहर उपनगरात वरळी, प्रभादेवी, ग्रँटरोड, धारावी, दादर, माहिम, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, वांद्रे, सांताक्रुझ, खार, गोवंडी, मानखुर्द या परिसरांत कोरोना बाधित आढळून येत आहे. याखेरीज, मुंबईत कोरोनामुळे होणाºया मृत्यूंमध्ये ३५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातही सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांचे वयोमान हे साधारण ४० ते ६० या गटातील जास्त आहे. त्यातच, प्रामुख्याने जिल्ह्यातील रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही.