Join us

Coronavirus In Maharashtra: सावधान! कोरोना पुन्हा डोके वर काढतोय; राज्यात संसर्ग दर वाढला, केंद्राचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 6:18 AM

कोरोनाच्या पुनःसंसर्गाचा धोका असणाऱ्या राज्यांनी प्रभावी लसीकरणावर भर दिला पाहिजे.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडलेल्या यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्या आहेत. राज्यात कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी दर वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश  भूषण यांनी महाराष्ट्रासह दिल्ली, तमिळनाडू, ओडिसा, कर्नाटक, केरळ  आणि तेलंगणा या राज्यांना सतर्कतेचा इशारा देत पत्र लिहिले आहे. या पत्रात कोरोनाच्या नियमांसह लसीकरणावर भर देण्यासही सुचविले आहे.

पत्रातील माहितीनुसार, देशातील सात राज्यांमध्ये कोरोनाचा साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी दर हा दहा टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पुनःसंसर्गाचा धोका असणाऱ्या राज्यांनी प्रभावी लसीकरणावर भर दिला पाहिजे. तसेच, पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य बाळगले पाहिजे. त्याचप्रमाणे, दुसरीकडे कोरोनाविषयक नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यावर भर द्यावा, असेही नमूद केले आहे. याशिवाय, या राज्यांतील जिल्ह्यांमध्ये होणारी रुग्णवाढ, अचानक वाढणारा संसर्ग, त्यामागील कारणे यांचा अभ्यास करावा, तसेच त्यावर बारकाईने नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

पत्रात म्हटलंय...

  • आगामी काळ हा सण, उत्सवांचा असल्याने या कालावधीत मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात. 
  • परिणामी, संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टीने हा काळ धोकादायक आहे.
  • त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.
  • राज्य सरकारांनी परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घ्यावा आणि आवश्यक असल्यास कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.

केंद्राला काळजी का? दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळमध्ये गेल्या सात दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट अचानक वाढल्याने पुन्हा कोरोनाची नवी लाट येऊ नये, यासाठी सतर्कतेचा इशारा राज्यांना दिला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकेंद्र सरकारकोरोना वायरस बातम्या