मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 'धारावी पॅटर्न'चा आदर्श महापालिकेने जगासमोर ठेवला. त्यानंतर आता प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती चक्क गुगल मॅपवर उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्रात आहे का? असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे? हे नागरिकांना समजणे सोपे होणार आहे. नुकतीच ही सुविधा सुरु झाली असून त्यामध्ये वेळोवेळी अद्ययावत बदल केले जातील, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
अशी सुचली कल्पना....
कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. अशा क्षेत्रांची अद्ययावत स्थिती नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे. पालिकेच्या संकेतस्थळावरुन मुंबईतील २४ विभागनिहाय नकाशांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्र दर्शविण्यात येतात. प्रत्येक नागरिकाला एका क्लिकवर आणि सोप्या पद्धतीने त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने पालिकेने गुगल मॅपची मदत घेण्याचे ठरवले. गुगलला देखील ही कल्पना आवडल्याने त्यांनी गुगल मॅपवर प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखित नकाशे उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे.
अशी मिळेल प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती....
मोबाईलवर गुगल मॅप हे ऍप्लीकेशन सुरु केल्यानंतर “कोविड १९ इन्फो” हा पर्याय निवडा. त्यानंतर मुंबई महानगराचा नकाशा “झूम” करुन पाहताना वेगवेगळे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात व कोविड १९ कन्टेन्मेंट झोन या उपशीर्षकासह दिसतील. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकते. तसेच “कोविड १९ इन्फो” निवडल्यानंतर बृहन्मुंबई महापालिका या पर्यायावर क्लिक केले, तर थेट पालिकेच्या संकेतस्थळावर stopcoronavirus.mcgm.gov.in या पृष्ठावर कोरोना विषयक संपूर्ण माहिती पाहता येते. भूगोल जीआयएस आणि जेनेसीस यांचाही पालिकेच्या या उपक्रमामध्ये हातभार लागला आहे.
- ही माहिती उपलब्ध करण्यासाठी गुगलने महापालिकेकडून मोबदला घेतलेला नाही.
- गुगल सर्च इंजिनमध्ये मुंबई कोरोना व्हायरस अपडेटस् असे टाईप करताच पालिकेच्या संकेतस्थळावरुन सोशल मीडियावर प्रसारित होणारी माहिती प्रकट होते.
- इतर शहरांच्या प्रशासनानेही गुगलसोबत मिळून याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे