CoronaVirus: कूपरमधील ‘त्या’ घटनेची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 02:02 AM2020-04-25T02:02:14+5:302020-04-25T02:03:15+5:30
रुग्णालय प्रशासनाचा निर्णय; केईमए रुग्णालयात मृतदेहाची अवहेलना
मुंबई : महापालिकेच्या कूपर रुग्णालयात गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला. येथील विलगीकरण कक्षात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानंतर आठ तास उलटून गेल्यानंतरही त्याला हात लावला गेला नव्हता. आठ तास कोरोनाग्रस्ताचा मृतदेह खाटेवर तसाच पडून होता आणि त्याला कुणीही हात लावायला तयार नव्हता, या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आता याबाबत चौकशी करुन अहवाल तयार करण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्यास दिलेला नकार आणि पंचनामा करण्यासाठी जुहू पोलीस वेळेवर पोहोचू न शकल्याने हा उशीर झाला.
नेमके किती तास मृतदेह तिथे पडून होते याची माहिती नाही. याबाबतची संपूर्ण माहिती मागवण्यात आली असून त्याचा अहवाल तयार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. 'कोविड १९'चे संशयित असलेल्या रुग्णांच्या मृतदेहांना हात लावण्यास कुणीही तयार होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कूपरमधील पाचही मृतांमध्ये कोविड १९ ची तीव्र लक्षणे होती. पोलिसांना याबाबतीत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती कूपरचे अधिष्ठाता डॉ. पिनाकीन गुज्जर यांनी दिली़ दरम्यान, असा प्रकार होऊ नये यासाठी सर्वत्र योग्य काळजी घेण्याचे आवाहन याआधी प्रशासनाने सर्व स्तरावर केले आहे़ तसेच कोरोना बाधित रूग्णाला योग्य ते उपचार मिळावेत यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत़ मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ अडचणींचा सामना करत वैद्यकीय कर्मचारी काम करत आहेत़
या काळात वैद्यकीय कर्मचाºयांवर हात उगारण्याचे प्रकारही घडले आहेत़ अशा घटनांचा कर्मचाºयांनी विरोधही केला आहे़ कोरोना संकटात जीवाची बाजी लावून वैद्यकीय कर्मचारी काम करत आहेत़ त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी आहे़
केईएम रुग्णालयात रविवारी कोविड कक्षामध्ये मृत्यू झालेल्या दहा जणांचे मृतदेह ठेवण्यासाठी शवागारात जागा नव्हती. त्यामुळे हे मृतदेह रुग्णालयाच्या २० क्रमांकाच्या कोविड कक्षामध्येच ठेवण्यात आले.
सोमवारी सायंकाळी यापैकी पाच मृतदेहांसाठी विशेष किटची व्यवस्था करण्यात आली, तर उर्वरित पाच मृतदेह हे घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात येणाºया पिशव्यांच्या साहाय्याने सीलबंद केले. मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
प्रशासनाने यात लक्ष घालून मृतदेहांची अवहेलना थांबवावी. तसेच रुग्णांना नाकारणाºया खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.