मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 32 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी मुंबईमधील कस्तुरबा गांधी रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी खबरदारीसाठी MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे. त्यातील 9 जण कस्तुरबा गांधी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत. तर, कस्तुरबा गांधी रुग्णालयात एकूण 80 संशयित रुग्ण दाखल आहेत. तसेच, कस्तुरबा गांधी रुग्णालयामधील बेड्ची क्षमता 100 पर्यंत केली जाणार आहे. याशिवाय, कस्तुरबा गांधी रूग्णालयासह मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयातही कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. दिवसाला २५० नमुने तपासण्याची क्षमता असलेली यंत्रणा उभारण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
याचबरोबर, कोरोना रुग्णांना टीव्ही, वायफाय, जेवण यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात 400 बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. कोरोनाच्या तपासणी लॅबची संख्या वाढवली जाणार आहे. येत्या 15 ते 20 दिवसांत पुण्यात नव्या लॅबच्या सुविधा देणार आहेत. डॉक्टरांना लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. याशिवाय, मिरज, सोलापूर, धुळे आणि औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात पुढील 15 दिवसात अशी यंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरू असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
याशिवाय, MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या म्हणजेच या परीक्षा 30 तारखेनंतर घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.
आणखी बातम्या...
दोन दिवसांत प्रयोगशाळांची क्षमता वाढविणार, KEMमध्ये सुद्धा तपासणीची सोय - राजेश टोपे
CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार
Coronavirus : नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा
Corona virus : Coronaच्या संक्रमणादरम्यान व्हायरल झाली 'ही' शॉर्ट फिल्म, पाहून धक्काच बसेल!