- अतुल कुलकर्णीमुंबई : लोकांनी मास्क न वापरता बाहेर फिरणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे सरकारने येत्या काळात जनतेला मोफत अथवा नाममात्र दरात मास्क द्यावेत, चौकाचौकात कोरोना तपासणी करणारी केंद्रे सुरू करावीत. तसेच मुंबईतील खासगी आस्थापनांची कायार्लये दोन शिफ्ट मध्ये चालवावी, अशा महत्वपूर्ण शिफारशी टास्क फोर्सने राज्य सरकारला केल्या आहेत. नामवंत डॉक्टरांचा सहभाग असणारा टास्क फोर्स डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केला आहे. कोरोनाच्या रुग्णांची उपचारपद्धती निश्चित झाली असली तरी टास्क फोर्स चालूच राहील. उलट त्यांनी सरकारला वेळोवेळी शिफारशी कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. ओक म्हणाले, संपूर्ण जगाचा आढावा घेतला तर फारशी आशादायी परिस्थिती नाही. काही देशात दुसऱ्या टप्प्यात संचारबंदी लावण्याची वेळ आली आहे. आपण मात्र लॉकडाऊन पूर्णपणे काढून टाकल्यासारखे वागत आहोत. गणपतीच्या काळात लोक एकमेकांच्या घरी गेले आणि अख्खे कुटुंब कोरोनाग्रस्त झाल्याची असंख्य उदाहरणे समोर आली. दिवाळीत देखील एकमेकांच्या घरी जाण्याची प्रथा आहे. एकमेकांना बिना मास्क, बिना सॅनिटायझर भेटू लागलो तर पुन्हा लाट यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे हा आजार अतिशय गंभीरपणे घेण्याची गरज आहे. आजही असंख्य लोक बिना मास्क फिरताना दिसतात. त्यांना दंड लावला तर त्याचे पैसे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे सरकारने आधी मास्क मोफत द्यावेत, फार फार तर एक रुपया, दोन रुपये त्याची किंमत ठेवावी. पण हे करूनही जर लोक मास्क वापरत नसतील तर त्यांच्यावर खुशाल गुन्हे दाखल करावेत. त्यासोबतच चौकाचौकात कोरोना तपासण्यांची तात्पुरती सेंटर उभी करावीत. लोकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, त्यासाठी नाममात्र शुल्क ठेवावे. पुढचे दोन आठवडे विनामूल्य तपासणी करता येते का ते पाहावे. तसे झाले तर आपल्याकडे तिसऱ्या टप्प्यातली कोरोनाची लाट आपण पूर्णपणे नियंत्रणात आणू शकू, अशी शिफारसही आम्ही सरकारला केल्याचे डॉक्टर ओक म्हणाले.
मुंबई दोन शिफ्टमध्ये चालू ठेवा..! सरकारने मुंबई रात्री बंद ठेवायची कशाला? असा प्रश्न टास्क फोर्स पुढे चर्चेला आला होता. आपण मुंबई दोन शिफ्टमध्ये चालू ठेवली, संध्याकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत कार्यालये चालू ठेवू शकलो, लोकांना व्यवसाय, व्यवहार करायला परवानगी दिली, तर त्याचा फायदा ठराविक वेळेला होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी करता येईल. परिणामी कोरोनाची लागण जास्त होणार नाही. याबाबत सरकार निश्चित विचार करेल अशी आपल्याला आशा असल्याचे डॉ. ओक म्हणाले. रेमडेसीवीर रुग्णांना वाचवण्यासाठी उपयोगी ठरत आहे, त्यामुळे त्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आलेली नाही. हे औषध कधी, कुठे, कसे द्यायचे याविषयीच्या सूचना फोर्सने वेगवेगळ्या पातळीवर डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या सर्वांना दिलेल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.