coronavirus: नवनियुक्त पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल घेणार २४ विभागांची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:17 AM2020-05-11T07:17:13+5:302020-05-11T07:18:01+5:30
पोलिसांसह समन्वय साधा : कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे रुग्णवाहिकांचे नियोजन करा
मुंबई : मुंबईतील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल हे महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामाचा प्रत्यक्षपणे आढावा घेणार आहेत. तसेच आपापल्या कार्यक्षेत्राची परिस्थिती व गरज लक्षात घेऊन सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष आढावा बैठक संपन्न झाली. या वेळी त्यांनी कंटेन्मेंट झोनविषयक कार्यवाही अधिक प्रभावी व्हावी, यासाठी प्रत्येक कंटेन्मेंट झोनसाठी समन्वयक म्हणून कोविड योद्ध्यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात करावी. कंटेन्मेंट झोन परिसरात आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा होत असल्याची खातरजमा वेळोवेळी करावी. तसेच महापालिका क्षेत्रातील १०० कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करावे, असे निर्देश चहल यांनी या वेळी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्तांनी सदर बैठकीदरम्यान घेतला. बैठकीला विशेष कार्य अधिकारी मनीषा म्हैसकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, विशेष कार्य अधिकारी प्राजक्ता लवंगारे, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू व रमेश पवार, उपायुक्त चंद्रशेखर चोरे उपस्थित होते.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम आणखी प्रभावीपणे आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे आहे. सध्या हे प्रमाण एका बाधित रुग्णाच्या मागे तीन असे दिसते. हे प्रमाण किमान एकाच्या मागे सहा असे असावे. यात अतिधोकादायक संपर्कांचा कसून शोध घेतला जायला हवा. झोपडपट्ट्यांमधील असे संपर्क लगेच संस्थात्मक अलगीकरण केंद्रात स्थलांतरित करावे, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.
जबाबदाऱ्यांचे सुनिश्चित वाटप हवे
सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कार्य व जबाबदाºयांचे अधिक सुनिश्चित व अधिक परिणामकारक वाटप करावे. सर्व विभागस्तरीय सहायक आयुक्त हे त्यांच्या विभागाचे आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागात घडणाºया विविध बाबींवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवणे व आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रात महापालिकेची जी रुग्णालये येतात, त्या रुग्णालयांमधील कार्यवाहीवर लक्ष ठेवणे व तेथील व्यवस्था अधिकाधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देऊन अपेक्षित कार्यवाही करून घेणे; ही जबाबदारी सहायक आयुक्तांची आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची बेड क्षमता वाढविण्यासह बेड व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश चहल यांनी दिले.