coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण करणे महत्त्वाचे, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:13 AM2021-03-30T03:13:14+5:302021-03-30T03:13:48+5:30
coronavirus in Mumbai : राज्यात काेराेना वाढत असतानाच संसर्गित रुग्णांचे निदान हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे. अनेक लोकांना स्वत:हून विलगीकरण होण्याचा, घरीच उपचार घेण्याचा, तसेच नॉन-हेल्थकेअर ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात काेराेना वाढत असतानाच संसर्गित रुग्णांचे निदान हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे. अनेक लोकांना स्वत:हून विलगीकरण होण्याचा, घरीच उपचार घेण्याचा, तसेच नॉन-हेल्थकेअर ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही जणांना पूर्णपणे क्वारंटाइन होण्यासोबत घरीच रुग्णांची काळजी घ्यावी लागू शकते. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी रोखण्यासाठी विलगीकरण महत्त्वाचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.
घरात किंवा अन्य ठिकाणी विलगीकरण करत असताना घरातील डोअरनॉब्स, लाइट स्विचेस्, टीव्ही, रिमोट्स, कॅबिनेट्स, किचन काऊंटर्स यांसारखे वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग आणि इतर वस्तूंचे नियमितपणे सोडिअम हायपोक्लोराइट सोल्यूशनसह निर्जंतुकीकरण करावे, स्वत: एकाच खोलीत राहा. दिवसातून किमान दोन वेळा तापमान, हृदयाचे ठोके व ऑक्सिजन पातळी अशा प्रमुख आरोग्यविषयक बाबींची तपासणी करा, याबाबतची माहिती टेलिफोनवरून डॉक्टर आणि कुटुंबातील सदस्यांना सांगा. किराणा माल, औषधे इत्यादींची घरपोच डिलिव्हरी घेण्यासाठी बाहेर येताना मास्क घाला.
साबण व पाण्याने वारंवार हात स्वच्छ धुवा, अल्कोहोल आधारित सॅनिटायजरचा वापर करा. संसर्गाची साखळी मोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुरक्षित राहणे, योग्य कोविड नियमांचे पालन करणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांना कळवणे, असे इन्फेक्शिअस डीसीज स्पेशालिस्ट डॉ. कीर्ती सबनीस यांनी सांगितले.
तुमच्यासाठी असलेल्या भांड्यांचा वापर करा, वापरानंतर भांडी गरम पाण्यात वेगळी धुवा. तुमच्यासाठी असलेले शौचालय व बाथरूमचा वापर करा. दररोज निर्जंतुक/ ब्लीच पावडरसह ते स्वच्छ धुवा. निवडक कपडे, बेडिंग्ज, उशी कव्हर्स इत्यादींचा वापर करा. दर दोन दिवसांनी ते बदला, गरम पाण्यात धुवा आणि वेगळे स्टोअर करून ठेवा. शक्यतो स्वत:हून शिजवलेल्या आरोग्यदायी व पौष्टिक आहाराचे सेवन करा किंवा घरी बनवलेले अन्न घरपोच मागवून घ्या. तुम्हाला लक्षणे असल्यासारखी वाटल्यास त्वरित डॉक्टरांना कळवा. टेलिफोन / व्हिडीओ कॉलवरून डॉक्टरांशी संपर्क साधणे हे सर्वोत्तम आहे. १४ ते २० दिवसांचे आयसोलेशन पूर्ण केल्यानंतर तुमच्या घरातील सर्व पृष्ठभाग निर्जंतुक व स्वच्छ करा. पूर्णपणे बरे झाल्यानंतरही किमान २५ ते ३० दिवस कुटुंब व पाहुण्यांना भेटणे टाळा, असा सल्ला डॉ. फराह इंगळे यांनी दिला.
घरी आयसोलेट केलेल्या रुग्णांची अशी घ्या काळजी
उत्तम खेळती हवा असलेल्या वेगळ्या खोलीत रुग्णाचे क्वारंटाइन करा. त्या खोलीत फक्त रुग्णाला वापरण्यासाठी बाथरूम असावे. जेवण, औषधे, स्वच्छ कपडे इत्यादींसारख्या गोष्टी दरवाजापर्यंत देण्यासाठी, रुग्णाची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील फक्त एकाच सदस्याची निवड करा. रुग्णाच्या जवळ जाताना प्रत्येक वेळी मास्क घाला. त्याची भांडी किंवा कपड्यांची हाताळणी करताना डिस्पोजेबल ग्लोव्हजची जोडी ठेवा आणि रुग्णापासून किमान सहा फूट शारीरिक अंतर ठेवा. वर्तमानपत्र, चहाचे कप, पाण्याची बाटली इत्यादीसारख्या कोणत्याही वस्तू रुग्णासोबत शेअर करू नका.
दिवसातून किमान २ ते ४ वेळा ऑक्सिजन पातळी, तापमान व रक्तदाब अशा रुग्णांच्या आरोग्यविषयक बाबींची तपासणी करा. ती करताना मास्क व ग्लोव्हज परिधान करा. रुग्णाच्या कचऱ्याच्या डब्याला दुप्पट पॅकिंग करावी आणि योग्यरीत्या विल्हेवाट लावावी. रुग्णाच्या क्वारंटाइन कालावधीदरम्यान आणि पूर्णपणे बरे झाल्यानंतर १५ दिवस पाहुण्यांच्या भेटण्यावर निर्बंध ठेवा. रुग्ण स्वत:हून त्याची भांडी व कपडे धुण्यास असक्षम असेल तर ते गरम पाण्यात वेगळे धुवा, सुकवा आणि कुटुंबातील इतर वस्तूंपासून वेगळे ठेवा.
घरी असलेल्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी ९६ टक्के (किंवा त्यापेक्षा अधिक) असण्याची, अधिक श्वसन दर सामान्य स्थितीमध्ये प्रतिमिनीट १६ पेक्षा कमी असण्याची काळजी घ्यावी. रुग्णांनी वारंवार खोलीत चालावे. रुग्णाची काळजी घेत असलेल्या डॉक्टरांना सतत रुग्णाच्या स्थितीबाबत कळवत राहावे. यासाठी व्हिडिओ कन्सल्ट हा प्राधान्य मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.