Coronavirus: लालबागच्या राजाची मूर्ती न आणण्याचा निर्णय घेणे मंडळासाठी सोपे नव्हते! - सुधीर साळवी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:20 AM2020-07-04T01:20:07+5:302020-07-04T01:21:01+5:30
लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव; शहिदांच्या कुटुंबीयांचा होणार ऑनलाइन सन्मान, कोणीही मंडळाचा निर्णय चुकीचा ठरवलेला नाही. निर्णयाबद्दल टीका केलेली नाही. लोकांनी, मान्यवरांनी सूचना केल्या आहेत.
मुंबई : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार नसल्याची भूमिका घेतली. गर्दी आणि संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने जाहीर केले. या निर्णयानंतर समाजाच्या विविध स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. जसे मंडळाच्या भूमिकेचे स्वागत झाले तसे ‘राजा आणि भक्ताची ताटातूट’ होत असल्याची तक्रार झाली. या सर्व विषयावर मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंडळाची भूमिका अधिक स्पष्ट केली.
मंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या वादाकडे लालबागचा राजा मंडळ कसे पाहते?
साळवी - सर्वांशी चर्चा करून, मंडळाने आपली भूमिका जाहीर केली. साहजिकच त्याची चर्चा होणार. लालबागचा राजासोबत लाखो लोकांच्या भावना, श्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. आमच्या भूमिकेवर अनेकांनी मते मांडली. काही लोकांना वेगळा विचार करण्याबाबत आवाहन केले. हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी, लालबागचा राजा सर्वांचा देव आहे. मत मांडण्याचा, आवाहन करण्याचा अधिकार सर्वांना आहे.
पण, या आवाहनाला आपण कसा प्रतिसाद देणार? मंडळ फेरविचार करणार आहे का?
साळवी - याबाबत आम्ही अत्यंत नम्रपणे आमची भूमिका स्पष्ट करू इच्छितो. कार्यकारिणी, सर्व सभासद, जुन्याजाणत्यांशी चर्चा करूनच आम्ही निर्णय घेतला आहे. मंडळाने एकमताने घेतलेला निर्णय आहे. यात आता बदल होईल असे वाटत नाही. आम्ही जड अंत:करणाने हा निर्णय घेतला आहे. सर्वांनी आपापली मते मांडली. मंडळाचा निर्णय आणि भूमिका सर्व जण समजून घेतील, अशी आम्हाला आशा आहे. आता आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे.
म्हणजे, आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहात?
साळवी - ठाम आहोत वगैरे असा अर्थ नाही. आमची ती भूमिकाही नाही. हे काही राजकारण नाही. सगळेच गणेशभक्त आहेत. त्याच भावनेने आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे कोणीही मंडळाचा निर्णय चुकीचा ठरविला नाही किंवा निर्णयाबद्दल टीका केलेली नाही. लोकांनी, मान्यवरांनी आवाहन केले आहे. सुचविले आहे. अशा प्रकारे मत मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण, मंडळाची भूमिका सर्व जण समजून घेतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
पण, आरोग्य उत्सव आताही होऊ शकतो, अशी भाषा होत आहे.
साळवी - आरोग्याच्या क्षेत्रात लालबागचा राजा मंडळ वर्षानुवर्षे काम करीत आहे. अगदी कोरोनाच्या काळातही आम्ही सामाजिक जबाबदारी लक्षात घेत कार्यक्रम आखले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शारीरिक अंतर राखत, सुरक्षेची काळजी घेत रक्तदान शिबिर घेतले. या अनोख्या आणि पहिल्यावाहिल्या रक्तदान शिबिराचे मोठ्या प्रमाणावर कौतुकही झाले. जनता क्लिनिकही सुरूच आहे. या सर्व उपक्रमांत आणखी भर टाकत यंदाचा ‘आरोग्य उत्सव’ साजरा केला जाईल.
या आरोग्य उत्सवामुळे गर्दी होणार नाही का?
साळवी - ही गर्दी नियंत्रित असेल. उपक्रमाच्या आखणीला, तयारीला ५० दिवसांचा वेळ मिळाला आहे. रक्तदान शिबिरासह विविध आरोग्य उपक्रमांच्या परवानगींची प्रक्रिया सुरू आहे. अगदी, शहिदांच्या कुटुंबीयांच्या सन्मानाचा कार्यक्रमही ऑनलाइन होणार आहे. सुरक्षेचा प्रश्नच निर्माण होणार नाही. कुटुंबीयांची यादी बनविणे, सन्मानचिन्ह, सहायता निधीची रक्कम अशा सर्व बाबींवर काम सुरू आहे. पुढील दहा दिवसांत त्याची रूपरेषा नक्की होईल. गर्दी टाळतच कार्यक्रम होतील, इतका विश्वास यानिमित्ताने मी आपल्याला देतो.
शब्दांकन - गौरीशंकर घाळे