मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्याने मास्क घालण्याबाबत नागरिक अद्यापही निष्काळजीपणे वागत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार ‘कोरोना नियंत्रणात आला म्हणून मास्क गळ्यात!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसारित केले होते. याच बाबीचा आता मुंबई पोलिसांनीही ट्विटरवर उल्लेख करत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
गणेशोत्सवास सुरुवात होत असतानाच ठिकठिकाणी खरेदीपासून बाप्पाचे आगमन तसेच विसर्जन करण्यासाठी गर्दी होणार याची पूर्ण कल्पना मुंबई पोलिसांना आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर याबाबत ‘लोकमत’ टीमने एक आढावा घेतला होता. त्यावेळी मास्क तोंडावर न लावता गळ्यात घालून नागरिक गप्पा मारत असल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानुसार २१ ऑगस्ट, २०२० रोजी ‘लोकमत’मध्ये ‘कोरोना नियंत्रणात आला म्हणून मास्क गळ्यात’ हे वृत्त प्रकाशित करण्यात आले. मुंबई पोलिसांनीही गळ्यात तसेच कानात मास्क लटकवून फिरणाऱ्यांसाठी ‘मास्क घालण्याची एकच पद्धत असून ती लक्षात ठेवणे सोप्पेआहे’ असे ट्विट केले असून त्याचे प्रतीकात्मक चित्रही यासोबत प्रकाशित करण्यात आले आहे.