Join us

Coronavirus: जितेंद्र आव्हाडांनी घेतलं ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह पत्रकाराचं नाव; कारवाई करा, भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 7:00 PM

काही दिवसांपूर्वी अनंत करमुसे प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाली होती

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांच्या वर पोहचली आहे. राज्यातील या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पक्षीय राजकारण सोडून एकजुटीने काम करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र राज्यातलं जितेंद्र आव्हाड प्रकरण अद्याप शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पत्रकाराचं नाव घेतल्याने भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला. याबाबत ट्विट करुन किरीट सोमय्या म्हणाले की, एका मराठी चॅनेलला जितेंद्र आव्हाडांनी लाईव्ह मुलाखत दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी एका कोरोना लागण झालेल्या पत्रकाराचं नाव घेतलं. त्यामुळे मंत्र्यांनीच अशाप्रकारे नियमाची पायमल्ली केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नावे उघड करु नका असं सांगितलं असताना त्यांनी हा कायदा मोडला आहे असा आरोप सोमय्या यांनी केला.

तर कोरोना रुग्णांची माहिती उघड केल्याप्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अनंत करमुसे प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाली होती. यावेळी किरीट सोमय्या पीडित तरुणाला भेटण्यासाठी जाण्याची तयारी केली. मात्र त्यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सोमय्या यांना मुलुंड येथील त्यांचं निवासस्थान निलम नगर येथून अटक करण्यात आली होती.  पोलिसांनी सोमय्या यांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली होती. मात्र, तरी देखील सोमय्या घराबाहरे पडले, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

तसेच आव्हाड प्रकरणात बातमी देणाऱ्यांबद्दल अनिल देशमुख यांनी जी तत्परता दाखवली तशीच तत्परता आणि काळजी करमुसे प्रकरणात दाखवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचसोबत अनंत करमुसे यांना ज्यांनी मारहाण केली त्यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे करमुसे कुटुंबाची आणि संबंधित पोलिसांची कोरोनाची लागण झाल्याची चौकशी केली का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसभाजपा