- मनोहर कुंभेजकर मुंबई : सुमारे सहा लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेला विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम असा एकत्रित मिळून पालिकेचा के पश्चिम वॉर्ड आहे. या भागात कालपर्यंत कोविड-१९ चे ८९४ रुग्ण होते. त्यापैकी २७६ रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले. तर ४२ जणांचा मृत्यू झाला़ हे प्रामुख्याने कूपर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलेले रुग्ण होते. त्यामुळे कोविड-१९च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालून याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी के पश्चिम वॉर्डची टास्क फोर्स समिती गठीत करण्यात आली आहे. के पश्चिम वॉर्डचे सहायक पालिका आयुक्त विश्वास मोटे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे व पालिका उपायुक्त परिमंडळ ४ चे पालिका उपायुक्त रणजित ढाकणे यांच्याशी के पश्चिम वॉर्डमध्ये कोविड-१९चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चर्चा झाल्याप्रमाणे कोविड-१९ रुग्ण के पश्चिम वॉर्डच्या विशेष करून झोपडपट्टी भागात कमी करण्यासाठी येथील सात भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. जुहू, वर्सोवा, ओशिवरा, डी.एन. नगर, सांताक्रुझ या ५ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची टीम लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर पालिकेचा दुय्यम अभियंता, आरोग्य खात्याचा कर्मचारी, दुय्यम अधिकारी आणि त्या भागात परिचित असलेला कार्यकर्ता, अशी पाच जणांची ही टास्क फोर्स टीम गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या सात झोपडपट्टी भागात प्रामुख्याने नेहरूनगर, वर्सोवा, आनंदनगर, गावदेवी डोंगरी-गिल्बर्ट हिल, जुहू कोळीवाडा, जुनियाद नगर-समतानगर, जुहू गल्ली-धनगरवाडी यांचा समावेश असल्याचे मोटे म्हणाले.के पश्चिम वॉर्डच्या कोविड १९च्या रेड आणि रेड प्लस झोनमध्ये लॉकडाउनच्या ठोस अंमलबजावणीसाठी स्टँडर्ड आॅपरेशन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात स्वच्छतेसाठी के पश्चिम वॉर्डच्या घनकचरा व्यवस्थापनाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक टीमने त्या क्षेत्राचे सर्वेक्षण करून कोरोनाच्या प्रवेशाच्या निर्गमन बिंदू शोधून प्रवेश व निर्गमन बिंदूवर कमाल मर्यादा निश्चित करावी. पोलिसांच्या सल्ल्यानुसार या सात भागात नियुक्त कंत्राटदारामार्फत वॉच टॉवर उभारला जाणार असून, नागरिकांना सूचना देण्यात येतील.तसेच कार्यसंघ व्यवस्थापक, या वॉर्डचा आरोग्य व इतर खात्याचा कर्मचारी, त्या भागातील सक्रिय कार्यकर्ता हा कोविड १९च्या सकारात्मक आणि उच्च जोखमीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवतील. नागरिकांच्या सोयीसाठी किती दुकाने खुली ठेवायची आहेत आणि त्यांचा वेळ या पथकाद्वारे निश्चित केला जाईल.आवश्यक निर्णय घेणारहोम डिलिव्हरीची व्यवस्था आवश्यक असेल तेथे केली जाईल. तसेच नियुक्त टीम ही त्या त्या भागात कठोर लॉकडाउनचे पालन सुनिश्चित करील आणि टीम आवश्यक निर्णय घेण्यास अधिकृत असेल, असा विश्वास मोटे यांनी शेवटी स्पष्ट केला.
coronavirus: के पश्चिम वॉर्डची टास्क फोर्स समिती स्थापन, कोरोनाला आळा घालणार, सहायक पालिका आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 3:18 AM