मुंबई: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढवला जात असल्याची घोषणा काल केली. मात्र यानंतर काल संध्याकाळी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मजुरांची गावी परतण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मात्र यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजले. पोलिसांच्या शिष्टाईमुळे प्रकरण नियंत्रणात आलं. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीका केली. यानंतर आता बॉलिवूडमधूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अभिनेते कमल हासन यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. 'बाल्कनीतून सगळे लोक जमिनीवर पाहत आहेत. आधी दिल्ली आणि आता मुंबई. प्रवासी मजुरांचं संकट आता एखाद्या बॉम्बप्रमाणे आहे. हा बॉम्ब निकामी करणं अत्यावश्यक आहे. कारण हे संकट कोरोनापेक्षा मोठं होऊ शकतं. बाल्कनी सरकारला त्यांची नजर जमिनीवर ठेवायला हवी. त्यामुळे जमिनीवर नेमकं काय घडतंय हे त्यांना कळेल,' असं हासन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
CoronaVirus: 'मजूर प्रवाशांचं संकट बॉम्बसारखं; ही समस्या कोरोनापेक्षा मोठी होऊ शकते'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:08 AM