Coronavirus: कोरोनाबाधितांसाठी झटणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयाचा नवा विक्रम; वाचून आदर वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 09:23 PM2020-03-25T21:23:29+5:302020-03-25T21:24:52+5:30
गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या ३७२ वैद्यकीय चाचण्या
मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढतोय. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यासह पालिकेचा आरोग्य विभागही अहोरात्र झटतोय. आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयाच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चमूच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झालीय. या चमूने अवघ्या चोवीस तासात कोरोनाच्या ३७२ वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे या अविरतपणे झटणाऱ्या लढणाऱ्या यंत्रणांना मुंबईकरांचा सलाम आहे.
कोरोना जसा जसा राज्यात पसरु लागला त्यावेळी या आजाराचे महत्त्वाचे केंद्र हे मुंबई व पुणे शहर ठरले. त्यामुळे या मेट्रो शहरातील यंत्रणांनी अधिक सर्तकता पाळून रात्रीचा दिवस करुन मोठ्या प्रमाणात यंत्रणा निर्माण केली. पहिल्या टप्प्यात कस्तुरबा, त्यानंतर अन्य पालिका रुग्णालयांत कोरोनासाठी सज्ज केली. त्यानंतर रुग्णालयांप्रमाणे खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांचाही यात अंतर्भाव करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता खासगी- सरकारी प्रयोगशाळातील कोरोना चाचण्यांची क्षमताही वाढविण्यात आली आहे.
कस्तुरबा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या तपासण्या, अहवाल यांची गतीही वाढायला हवी, कमी वेळात अचूक अहवालासाठी काम कऱणाऱ्या या चमूने मागील चोवीस तासांत हा नवा विक्रम नोंदविला आहे. यानंतर आता केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळांच्या चाचण्यांची क्षमताही वाढवण्यात आली आहे.