मुंबई : कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याकरिता मुंबईतील प्रमुख केंद्र कस्तुरबा रुग्णालयात उंदीर, घुशी आणि माजरांचे साम्राज्य असल्याने, एकंदरीतच अस्वच्छतेचे वातावरण असल्याचा आरोप एका वकिलाने याचिकेद्वारे केला आहे.कस्तुरबा या महापालिका रुग्णालयात अनेक संसर्गजन्य व साथीच्या आजारांवर उपचार करण्यात येतात. सध्या राज्यासह मुंबईतही कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात फैलावल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत कस्तुरबा हे मुख्य रुग्णालय आहे.मात्र, या रुग्णालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याचा आरोप व्यवसायाने वकील असलेले सागर कुर्सिजा यांनी केला. त्यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुख्य न्या.भूषण धर्माधिकारी व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे.‘रुग्णांना पोषक आहार द्यावा’याचिकेनुसार, देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, मूलभूत वैद्यकीय सोईसुविधांचे काय? कस्तुरबा या महत्त्वाच्या रुग्णालयात अस्वच्छतेचे वातावरण आहे. येथे उंदीर, घुशी, मांजरी यांनी धुमाकूळ घातला आहे. त्याशिवाय येथील स्वच्छतागृहेही अस्वच्छ आहेत. तेव्हा याबाबत रुग्णालय प्रशासनाला योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्ते कुर्सिजा यांनी केली, तसेच कस्तुरबा येथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना योग्य तो पोषक आहार देण्यात यावा, अशीही विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.
Coronavirus : कस्तुरबा रुग्णालयात घुशी, मांजरांचे साम्राज्य; न्यायालयात उद्या सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 1:26 AM