मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर आणि मास्कची साठेबाजी सुरू झाली आहे. साठा कमी असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, अन्न व औषध प्रशासन विभागाने या विक्रेत्यांना आता मास्क व सॅनिटायझरची नियमित उपलब्धता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे.केंद्र शासनाने मास्क व सॅनिटायझर आता अत्यावश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्यानुसार, आता यावर शासनाचे नियंत्रण राहणार आहे. मास्क, सॅनिटायझरचे अतिरिक्त दर, साठेबाजी, बनावट उत्पादन विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहर उपनगरात अशा काही तक्रारी असल्यास ग्राहकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासनाकडे याविषयी तक्रारी कराव्यात, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी नमूद केले आहे.यात काळाबाजारही होऊ शकेल, त्यामुळे गरजूंना ते बाजारात उपलब्ध होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ़प्रशासनाने केले आहे.
Coronavirus : ‘मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता ठेवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 3:08 AM