Coronavirus : वैयक्तिक स्वच्छता राखा, घाबरून जाण्याची गरज नाही - सुरेश काकाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:12 AM2020-03-15T05:12:52+5:302020-03-15T06:46:42+5:30
कोरोनाच्या संशयित रुग्णांमुळे अन्य लोकांना संसर्ग होणार नाही, याची मुुंबई महापालिकेकडून पुरेपूर काळजी घेत आहोत
- शेफाली परब-पंडित
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईतही आढळून आले आहेत. यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुकानातून मास्क आणि सॅनिटायझरही संपले असून त्यात अफवांनी भर घातली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने कोणती तयारी केली आहे? लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : कोरोनाचे रुग्ण मुंबईतही आढळून आले आहेत. त्यामुळे पालिका आता काय खबरदारी घेणार?
उत्तर : विमानतळ परिसरात विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. तिथे बाहेरगावाहून मुंबईत येणा-या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यात संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना तत्काळ अन्य प्रवाशांपासून वेगळे ठेवून रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अन्य लोकांना संसर्ग होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत आहोत. गेल्या महिन्यापासून परदेशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांवर महापालिकेचे आरोग्य पथक बारीक लक्ष ठेवून आहे. १४ दिवसांच्या कालावधीसाठी त्यांच्या तब्येतीची नियमित विचारपूस डॉक्टरांचे पथक करीत आहे. प्रत्यक्षात जाऊन अथवा फोनद्वारे संपर्क साधून आरोग्याची नोंद ठेवण्यात येत आहे.
प्रश्न : महापालिकेने कोरोनाचा सामना करण्यासाठी काय तयारी केली?
उत्तर : पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ७०, ट्रॉमा सेंटर २०, कुर्ला-भाभा १०, वांद्रे-भाभा १०, राजावाडी २०, फोर्टिस मुलुंड १५, बीपीटी ५०, बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रुग्णालय ३० अशा एकूण २३३ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे. गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांना आयसीयू सेवा मिळण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात सोय आहे. बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना वेगळे ठेवण्यासाठी अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात तीनशे खाटांची सुविधा आहे. तसेच ३० खाटांचा विलगीकरण कक्षही आहे.
प्रश्न : साधा सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांनीही तपासणी करून घ्यावी का?
उत्तर : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या देशांतून प्रवास करून आलेल्या नागरिकांना मुंबईत आल्यापासून १४ दिवसांच्या कालावधीत सर्दी, खोकला झाल्यास त्यांनी तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. त्यांच्या जवळ राहणा-या लोकांनीही आपली तपासणी करून घ्यावी.
मुंबईत भीतीचे वातावरण आहे. खरेच परिस्थिती बिकट आहे का?
कोरोनाची लागण झालेले सर्व रुग्ण परदेशातून आले असल्याचे दिसून आले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच अफवांवरही विश्वास ठेवू नका. दक्ष राहणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या नातेवाइकांना तत्काळ तपासणी व उपचारांची गरज आहे. सर्वसामान्य लोकांनी तोंडाला मास्क लावून फिरण्याची गरज नाही. सर्दी, पडसे असल्यास नाकावर रुमाल ठेवला तरी पुरेसे आहे. मात्र शिंका सतत येत असल्यास एक रुमाल सहा तासांहून अधिक काळ वापरू नये.
लोकांना कशा पद्धतीने सतर्क करण्यात येत आहे?
शाळा, महाविद्यालयांमध्ये कोरोनाची लक्षणे व कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया, वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. १९१६ या हेल्पलाइनवर लोकांनी संपर्क केल्यास त्यांना सर्व माहिती व त्यांची शंका दूर करण्यासाठी २४ तास डॉक्टर कार्यरत आहेत. वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक आहे.