CoronaVirus: दोन दिवस कुर्ला पुन्हा होणार बंद; आज आणि उद्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 02:08 AM2020-04-25T02:08:21+5:302020-04-25T07:10:15+5:30

कुर्ल्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवारसह रविवारी पुन्हा एकदा कुर्ला बंदची हाक येथील लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली आहे.

CoronaVirus: Kurla will be closed again for two days; Appeal not to leave the house today and tomorrow | CoronaVirus: दोन दिवस कुर्ला पुन्हा होणार बंद; आज आणि उद्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन

CoronaVirus: दोन दिवस कुर्ला पुन्हा होणार बंद; आज आणि उद्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन

Next

मुंबई : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वारंवार मुंंबईकरांना घरात बसण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी लॉकडाउन पायदळी तुडविले जात आहे आणि नागरिक क्षुल्लक कारणे देत घराबाहेर पडत आहे. विशेषत: मुंबईच्या मध्यभागी असलेल्या एल वॉर्डात म्हणजे कुर्ल्यात हे प्रमाण अधिक असून, येथील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. याला आळा घालायचा असेल तर कुर्लेकरांनो घराबाहेर पडू नका; नाही तर कुर्ल्याचा वरळी कोळीवाडा होईल, असे म्हणत कुर्लेकरांना घरात बसण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, कुर्ल्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवारसह रविवारी पुन्हा एकदा कुर्ला बंदची हाक येथील लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली आहे.

वरळी कोळीवाडा, भायखळा आणि धारावी येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता कुर्ल्यातदेखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परिणामी, कुर्ल्यातील तरुण मित्रमंडळे, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून येथील नागरिकांना सातत्याने घरात बसण्याचे आवाहन केले जात आहे. येथील नागरिक सातत्याने घराबाहेर पडत आहे. कधी भाजीच्या नावाखाली, कधी मेडिकलच्या नावाखाली नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. कधी सोसायटीबाहेर, चाळीबाहेर, नाक्यावर तर कधी गच्चीवर नाहक गर्दी करत आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर येथील बाजारपेठेत तर कधी नव्हे तेवढी गर्दी आहे.

बाजारपेठेत मोठी दुकाने आहेत. होलसेल दुकानांमध्ये कुर्ला, धारावी, सायन, चेंबूर अशा लगतच्या परिसरातील नागरिक खरेदीसाठी येतात. कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर येथील बस स्टेशनकडे येणाऱ्या रस्त्यावरील गर्दी पाहून तर ही रोजची गर्दी आहे की काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथे नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत; ही वस्तुस्थिती आहे. येथे बाजारपेठ असल्याने लगतच्या परिसरातील नागरिक येथे खरेदीसाठी येत आहेत. गर्दीवर नियंत्रण असावे. येथील रस्त्यांवर गर्दी करू नये त्यावर नियंत्रण मिळविता यावे; यासाठी नेहरूनगर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवारसह रविवारी कुर्ला बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ कुर्लाच नव्हे तर मुंबई आणि सर्वच ठिकाणी कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी नागरिकांनी लॉकडाउनचे पालन करणे गरजेचे आहे, असेही मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.

कुर्ला पश्मिमेकडेदेखील फार काही वेगळी स्थिती नाही. कुर्ला रेल्वे स्थानकालगतचा रस्ता, लाल बहादूर शास्त्री मार्ग, हलाव पूल, लगतचा मार्केट परिसर, बैलबाजार येथील बाजारपेठ, एम.एन. रोड, वाडिया इस्टेट, क्रांतीनगर, संदेशनगर, काजुपाडा, कमानी, जरीमरी आणि साकीनाका येथील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने केले जात आहे, अशी माहिती मनसेचे येथील नगरसेवक संजय तुर्डे यांनी दिली. कोरोनाला हरविण्यासाठी घरातच बसणे आवश्यक असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येकाची काळजी घ्यावी. परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन केले जात आहे, असेही तुर्डे यांनी सांगितले.

चाळ, झोपड्या असल्याने धोका अधिक
सायनपासून कुर्ला डेपोपर्यंतच्या मिठी नदी किनारी मोठ्या प्रमाणावर झोपड्या वसल्या आहेत. येथील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत मोठ्या प्रमाणावर चाळी वसल्या आहेत.
कुर्ला रेल्वे स्थानकालगत मोठ्या इमारती, जुन्या चाळी आहेत. विद्याविहार रेल्वे स्थानकालगत वस्ती कमी असली तरी मोठ्या प्रमाणावर चाळी आहेत. येथे ख्रिश्चन गावात मोठ्या प्रमाणावर चाळी आहेत.
विमानतळाशेजारी संदेशनगर आणि क्रांतीनगरमध्ये झोपड्या आणि चाळी आहेत. वाडिया इस्टेट परिसरात जुन्या चाळी आणि इमारती आहेत़
जरीमरी येथे मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत. काजुपाडा येथे मोठ्या प्रमाणावर चाळी आहेत. साकीनाका येथ चाळी आणि झोपड्या आहेत. असल्फा येथेदेखील मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत.
भांडुप आणि मुलुंड येथे मोठ्या प्रमाणावर चाळी आहेत. यातील बहुतांश झोपड्या, चाळी या डोंगरउतारावर वसलेल्या आहेत.
मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, चुनाभट्टी येथे चाळी कमी असून, झोपड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. चाळी, झोपड्या, इमारती काही असले तरी येथील प्रत्येक जण कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आपल्या घरातील ५ वर्षांपेक्षा लहान मुलांना, ६० वर्षांपेक्षा अधिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व इतर कोणतेही आजार म्हणजेच डायबेटीस, दमा, ब्लडप्रेशर, हृदयासंबंधी आजार असलेल्यांना घराबाहेर न पाठवावे ही विनंती. आपणही घराबाहेर पडू नये, आपणास कोणतीही अडचण येत असल्यास आम्हाला, प्रशासनाला व पोलिसांना संपर्क करू शकता, असे आवाहन लोकप्रतिनिधी करत आहेत.

आपण सर्वांना मिळून कोरोना रोगाला हारवायचे आहे, ही जिद्द आपल्या मनात असायला हवी. आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घरी राहा, स्वस्थ राहा व सुरक्षित राहा.

Web Title: CoronaVirus: Kurla will be closed again for two days; Appeal not to leave the house today and tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.