CoronaVirus : सेंट जाॅर्ज रुग्णालयात सुरक्षा किट्सचा अभाव; जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचाऱ्यांची रुग्णसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 11:15 PM2020-04-05T23:15:53+5:302020-04-05T23:29:01+5:30
योग्य प्रशिक्षणाचा अभाव, पीपीई किट्स उपलब्धता नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत आमची काळजी कोण करणार असा सवाल उपस्थित केला आहे.
मुंबई – सेंट जाॅर्ज रुग्णालयात शनिवारी कोरोना रुग्णाचा संर्सगाने मृत्यू झाला. मात्र त्याचे निदान उशिरा झाल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. योग्य प्रशिक्षणाचा अभाव, पीपीई किट्स उपलब्धता नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत आमची काळजी कोण करणार असा सवाल उपस्थित केला आहे.
सेंट जॉर्जेस रुग्णालायात अति दक्षता विभागामध्ये असलेल्या परिचारिका तसेच मदतनीसांनी कोरोना रुग्ण हाताळण्याचे योग्य प्रकारची काळजी घेतली नसल्याचाही आक्षेप घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग आलेल्या रुग्णाचे वजन हे अंदाजे १५० किलो होते. हा संसर्ग असल्याचे कळल्यानंतर त्याचा मृतदेह कशाप्रकारे हाताळायचा याचे पुरेसे प्रशिक्षण नसल्याने त्याला नेमके कुणी हाताळायचे, अतिदक्षता विभागामध्ये कुणी जायचे यावरून रुग्णालयमध्ये मदतनीस आणि परिचारिका यांच्यामध्ये वाद सुरु होता.
जवळपास दीड तासाने अतिदक्षता विभागात डॉक्टर आतमध्ये जाऊन रुग्णाला लावलेली वैद्यकीय सामग्री काढण्यासाठी तयार झाला. आत एक परिचारिका आणि दोन मदतनीसांच्या मदत घेण्यात आली. पीपीई किट उपलब्ध असले तरीही ते कसे घालायचे याची माहिती वा प्रशिक्षण देण्यात आलेले नाही, असा आरोप त्यावेळी उपस्थित असलेल्या परिचारिकेने केला आहे. पीपीई कसे घालायचे याची माहिती नसल्यामुळे मदतनीसांनी ते कसेही घातले व काढले, त्यामुळेही संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरात दोन लहान मुल असल्यामुळे रुग्णालयामधून घरी कसे जाणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रुग्णाला पाहायचे आहे असाही घोशा नातेवाईकांनी लावला होता. याविषयी, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितले रुग्णालयीन कर्मचारी व अन्य सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय, सुरक्षा किट्सही उपलब्ध असून योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेण्यात येत आहे.
...........
विनंतीनंतर विलगीकरण
विनंती केल्यानंतर त्यांना विलगीकरणासाठी ठेवण्यात आले.मदतीला आलेल्या वाॅर्ड बाॅयने कोणतीही काळजी न घेता तसेच घरी निघून गेले तर दुसऱ्यांनी गरम पाण्याने आंघोळ करून ओले कपडे अंगावर घालून गेल्याचे त्यांनी सांगितले.