'लालबागचा राजा' मंडळाचा 'आरोग्य उत्सव' नेमका आहे काय?... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 10:23 AM2020-07-01T10:23:29+5:302020-07-01T10:24:47+5:30
यंदा गणेशोत्सव काळात आरोग्य उत्सव साजरा करण्याचा मंडळाचा निर्णय
मुंबई: सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या मोठ्या मूर्ती न आणण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आगमन, पाद्यपूजन सोहळेदेखील रद्द केले आहेत. यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा उत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. मंडळानं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा ८७ वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता 'आरोग्य उत्सव' म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
आरोग्य उत्सव म्हणजे काय?
प्लाज्मा थेरपीला प्राधान्य देऊन अधिकाधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प
११ दिवस प्लाज्मा आणि रक्तदानाच्या उपक्रमाचं आयोजन
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखांचा धनादेश देणार.
यंदा लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना केली जाणार नाही.
गलवान खोर्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान
कोरोना लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार
रक्ताचा तुटवडा जाणवू लागताच 1546 रक्तदात्यांचं रक्तदान
जनता क्लिनिक माध्यमातून आतापर्यंत रुग्णवाहिका, डॉक्टर यांच्या मदतीनं दक्षिण मुंबईत जनता क्लिनिक उपक्रम
मंडळाची डायलिसिस सेवा कोरोना संकट काळातही सुरू
यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय