यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 08:56 AM2020-07-01T08:56:05+5:302020-07-01T09:17:13+5:30
यंदा गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत आरोग्यसेवा करण्याचा मंडळाचा निर्णय
मुंबई: सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या मोठ्या मूर्ती न आणण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आगमन, पाद्यपूजन सोहळेदेखील रद्द केले आहेत. यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा उत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. मंडळानं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Mumbai's Lalbaughcha Raja Ganeshotsav Mandal has decided not to hold Ganeshotsav this time in wake of #COVID19 pandemic. A blood & plasma donation camp will be set up in its place: Lalbaughcha Raja Ganeshotsav Mandal (in the picture - last year's Ganpati idol at Lalbaughcha Raja) pic.twitter.com/1FiHg68QAX
— ANI (@ANI) July 1, 2020
सध्या राज्य कोरोनाच्या विळख्यात आहे. त्यातच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. लालबागच्या राजाला दरवर्षी मोठी गर्दी होते. लाखो भाविक राजाच्या दर्शनाला येतात. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मंडळानं गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आरोग्यसेवा करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. लालबागच्या राजाला ८६ वर्षांची परंपरा आहे.