मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सहा महिने लोटले असले तरी अजूनही घाबरून रुग्णालयात दाखल होणारा चारपैकी एक रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेतच भरती होतो, त्यामुळे ४८ तासांत त्याचा मृत्यू ओढावत असल्याचे निरीक्षण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी मांडले.राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ३७ हजारांहून अधिक बळी गेले. हे प्रमाण २७.५ टक्के आहे. त्यापैकी जवळपास १०,३०० रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांचा बळी गेला. सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या सुमारे पाच लाख नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले, तर मृत्यूही नऊ हजारांहून अधिक झाले. यातील २ हजार ६८१ मृत्यू हे रुग्णालयात भरती झाल्यानंतर ४८ तासांत झाल्याची माहिती टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. राज्यातील कोरोना मृत्यूंच्या विश्लेषणानुसार ठाणे शहरातील तब्बल ३० टक्क्यांहून अधिक मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यावर दोन दिवसांत झाले.राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे म्हणाले, कोरोना संसर्गाच्या सहा महिन्यांनंतरही काही नागरिक कोरोना चाचणी करून घेण्यास उशीर करतात. बऱ्याचदा लक्षणे अन्य कारणांमुळे असल्याचा समज करून घेतात. घरगुती उपचार, तात्पुरत्या वेदनाशामक गोळ्या घेण्याचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी, रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यास उशीर होत असल्याने गंभीर स्थिती निर्माण होऊन त्याचा मृत्यू होतो.लोकल सेवा सुरू करणे धोक्याचे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करणे तूर्तास धोकादायक ठरेल, असा अहवाल टास्क फोर्सने राज्य सरकारला नुकताच दिला आहे. लोकल सेवा सुरू केल्यास सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन प्रादुर्भावही वाढेल. त्यामुळे सध्या तरी नियंत्रणात आलेली ही स्थिती आटोक्यात येईपर्यंत वाट पाहणे योग्य ठरेल, असे अहवालात नमूद म्हटले आहे.
CoronaVirus News: रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याने वाढते मृत्यूचे प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 4:59 AM