मुंबई : मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत 7 हजार 812 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशा परिस्थितीत आपल्या जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांची तहान भागविण्यासाठी शहरातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे.
या तरुणांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांची तहान भागविण्यासाठी टेट्रा पॅक नारळ पाणी वाटप केले. टिळकनगर (चेंबूर) या भागातील अमित तांबेवाघ आणि सचिन शिंदे यांनी नीगगाय फूड लिमिटेड यांच्या सौजन्याने तब्बल दोन लाख रुपयांचे तीन हजार टेट्रा पॅक नारळ पाणी टिळकनगर पोलीस ठाणे, कुर्ला ट्रॅफिक पोलिसांना वाटप केले.
दरम्यान, मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मुंबईत 751 इतक्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या 7 हजार 812 वर पोहोचली आहे. तर 5 मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा 295 झाला आहे. याचबरोबर, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा अकरा हजारांवर पोहोचला आहे. शुक्रवारी राज्यात 1008 कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर एकूण रुग्णसंख्या 11 हजार 508 इतकी झाली आहे.