coronavirus: ...म्हणून वाढताहेत महाराष्ट्रात रुग्ण, समोर आली धक्कादायक माहिती

By अतुल कुलकर्णी | Published: September 4, 2020 03:11 AM2020-09-04T03:11:58+5:302020-09-04T03:12:18+5:30

राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण १०पेक्षाही कमी.

coronavirus: Less than 10 contact tracing in 28 districts in Maharashtra, So the number of patients in Maharashtra is increasing | coronavirus: ...म्हणून वाढताहेत महाराष्ट्रात रुग्ण, समोर आली धक्कादायक माहिती

coronavirus: ...म्हणून वाढताहेत महाराष्ट्रात रुग्ण, समोर आली धक्कादायक माहिती

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी
मुंबई : कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी (‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’) तातडीने केली पाहिजे, असे आदेश असताना राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण १० पेक्षाही कमी आहे. तर राज्यात हे प्रमाण फक्त ८.२ आहे. नागपूर आणि बीड हे दोनच जिल्हे असे निघाले आहेत, जेथे एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २० पेक्षा जास्त लोकांची तपासणी केली गेली आहे. महाराष्टÑात ग्रामीण भागात कोरोना वाढण्याचे हेच एकमेव महत्त्वाचे कारण आहे. पण सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आरोग्याशी संबंधीत यंत्रणा याकडे लक्षच द्यायला तयार नाहीत. त्यांच्याकडून काम करुन घेणारे वरिष्ठ अधिकारीच ढेपाळल्यासारखे वागत आहेत, तेथे खालच्या यंत्रणेला काय जाब विचारणार, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकमतला बोलताना आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. व्यास यांना दुसरे काम द्यावे व या जागी नवीन सचिव द्यावेत अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याचे ते म्हणाले.
‘हाय रिस्क’ गटातील लोकांची तपासणी तातडीने झाली तर त्याचा फायदा होतो. रुग्णसंख्या आटोक्यात येते. नाहीतर असे रुग्ण इतरांना बाधित करत रहातात, हे वारंवार सिद्ध झाले. आजही मुंबईत हाय रिस्क आणि लो रिस्क या दोन्ही गटांतून किमान २७.१ रुग्ण तपासले जात आहेत. पण हे प्रमाण सगळ्यात कमी परभणी (६.६) कोल्हापूर (७.१), नंदूरबार (७.३) या तीन जिल्ह्यांत आहे.

एक ज्येष्ठ आयएएस अधिकारी म्हणाले, ग्रामीण भागात मृत्यू वाढले कारण तेथे रुग्णच मुळात आजार झाल्यावर पाचव्या दिवशी दाखवायला येतात. आजार अंगावर काढण्याचे, लपवण्याचे प्रमाण जास्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात काय चालू आहे हे कोणी पहात नाही. रुग्ण गंभीर झाला की तो मोठ्या दवाखान्यात जात आहे, परिणामी अशा रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पुणे एवढा मोठा जिल्हा असूनही सगळा ताण ससून हॉस्पिटलवर आहे. आता जंबो हॉस्पिटल सुरूझाले पण त्यातही अद्याप सगळ्या सोयी नाहीत. मोठ्या शहरातील खाजगी हॉस्पिटलचे बेड ताब्यात घेतले नाहीत. ग्रामीण भागात वारंवार सांगूनही लोक मास्क वापरतच नाहीत, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत. त्यामुळेच परिस्थिती गंभीर होत आहे, असेही ते अधिकारी म्हणाले.

हाय रिस्क गटातील ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ची आकडेवारी
अहमदनगर ७.५, अकोला ७.६, अमरावती ७.२, औरंगाबाद ९.३, बीड २२.२, भंडारा १०.६, बुलढाणा ७.८, चंद्रपूर ८.५, धुळे १०.७, गडचिरोली १२.४, गोंदिया ९.४, हिंगोली १३.५, जळगाव ५, जालना ७.६, कोल्हापूर ५.६, लातूर ८.६, मुंबई ९.९, नागपूर २५.७, नांदेड ७.४.
नंदूरबार ५.३, नाशिक १०, उस्मानाबाद ६.१, पालघर ७.५, परभणी ५.८, पुणे ५.८, रायगड ६.७, रत्नागिरी ८.२, सांगली ७.३, सातारा ६.१, सिंधूदूर्ग ८.४, सोलापूर ५.९, ठाणे ८.९, वर्धा १०.७, वाशिम ८.७, यवतमाळ ७, राज्य ८.२

२,४६,००० कर्मचारी तरीही रुग्णांचा वेग जास्त
सार्वजनिक आरोग्य विभागात वर्ग १ ते गड ड यात काम करणारे ३९,२०४ कर्मचारी, ६५,२१९ आशा ताई, राष्टÑीय आरोग्य मिशनमध्ये काम करणारे ३१,०१८ कर्मचारी, जिल्हा परिषदेत काम करणारे जवळपास ५०,००० आरोग्य कर्मचारी, मुंबई महापालिकेत आरोग्य विभागात काम करणारे २०,००० कर्मचारी त्याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभागात राज्यभरात काम करणारे ४१,००० डॉक्टर्स, कर्मचारी असे तब्बल २,४६,४४१ डॉक्टर्स, कर्मचारी, नर्सेस, वॉर्डबॉय असा ताफा असूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होताना दिसत नाही.

ग्रामीण भागात अजूनही लोक जागरुक नाहीत. जालन्यात एका सरपंचाने आपल्याला कोरोना झाला तर कोणी मत देणार नाही म्हणून आजार लपवल्याचे समोर आले. आम्ही ट्रेसिंग वाढवत आहोत. रुग्ण जास्त दिसले तरी लक्षणेविरहित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. ज्यांच्याजवळ पैसे आहेत, असे लोक आॅक्सिजनचे बेड अडवून ठेवत आहेत.
- राजेश टोपे,
आरोग्य मंत्री

Web Title: coronavirus: Less than 10 contact tracing in 28 districts in Maharashtra, So the number of patients in Maharashtra is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.