- सीमा महांगडेमुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे मात्र अद्यापही लोकांना सोशल डिस्टंसिंगचे नेमके महत्त्व लक्षात आलेले नाही. ही बाब लक्षात घेऊन टीआयएफआर,(टाटा मूलभूत संशोधन संस्था) मुंबईने पुढाकार घेत सोशल डिस्टंसिंगमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कशी मदत होऊ शकते याचे महत्त्व व्हिडीओ स्वरूपात लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी हे माहितीपर व्हिडीओ बांग्ला, हिंदी, मराठी ,कोंकणी,मल्याळम, ओडिया तामिळ आणि तेलगू भाषेत तयार केले आहेत. आणखीन इतर प्रादेशिक भाषांतील व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याचे टीआयएफआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना नेमका कशामुळे होतो ? त्याची लक्षणे काय ? आणि सोशल डिस्टंसिंग संकल्पनेमागचा हेतू काय हे या व्हिडीओच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार कसा होतो हे हॅरिस स्टीव्हन्स यांनी सिम्युलेशन प्रोसेसद्वारे सगळ्यात आधी वॉशिंग्टन पोस्टसाठी प्रकशित केले होते. ते विविध भारतीय भाषांत मांडण्याचा टीआयएफआरने प्रयत्न केला आहे.
आपल्या रोजच्या आयुष्यात जेव्हा अनावश्यक प्रवास टळेल, गर्दी टाळली जाईल, वैयक्तिक स्वच्छतेसोबत इतरांचा कमीत कमी संपर्क होऊन सोशल डिस्टंसिंग राखली जाईल तेव्हा या विषाणूचा प्रसार आपोआप कमी होऊन त्याची चैन तुटणार आहे आणि डॉक्टरांना उपलब्ध साधनसामग्रीत सध्या बाधित असलेल्यावर उपचार करणे शक्य होणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी घरात सुरक्षित राहणे व सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व याद्वारे सांगितले जात आहे.
एका दिवसांत दहा हजार व्ह्यूज
व्हिडिओमध्ये सोप्या गणितीय मांडणीतून सोशल डिस्टंसिंग म्हणजेच मर्यादित संपर्कांने कसा कमी होऊ शकतो हे समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. टीआयएआरच्या या व्हिडीओजला एकाच दिवसांत हजारोंच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत.