CoronaVirus : "रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकलचा विचार करू, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:46 PM2021-06-20T12:46:32+5:302021-06-20T12:47:30+5:30
CoronaVirus: किशोरी पेडणेकर या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, बनावट लसीकरणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये दोन भरारी पथके काम् करत आहेत. आमचे काम सुरु आहे. कोणते रुग्णालय कसे काम करत आहे याकडे लक्ष आहे.
मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे. आम्हाला यश येत आहे. मात्र अद्यापही धोका कमी झालेला नाही. दुसरी लाट थोपविली जात असली तरी तिसरी लाट अधिक धोकादायक आहे, असे तज्ज्ञ म्हणत आहेत. परिणामी मुंबई महापालिका लसीकरण आणखी वेगाने करत असून, आता लोकल सुरु करण्याचा विचार करायचा झाला तर आजही पाचशे ते सहाशे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली तर लोकलचा विचार करू. पण लोकांच्या जीवावर बेतेल, असे काही करणार नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
किशोरी पेडणेकर या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, बनावट लसीकरणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये दोन भरारी पथके काम् करत आहेत. आमचे काम सुरु आहे. कोणते रुग्णालय कसे काम करत आहे याकडे लक्ष आहे. आम्ही सगळी माहिती ठेवत आहोत. सिरमलादेखील पत्र दिले आहेत. स्पष्टीकरण देखील मागितले आहे. महापालिका आणि पोलीस चौकशी करत आहेत. कांदिवली येथील लसीकरणाच्या प्रकरणानंतर लोक घाबरले आहेत. आणि सावध झाले आहेत. महापालिकेने संबंधित ठिकाणी लसीकरणासाठी परवानगी दिली आहे का? याची चौकशी स्वत: नागरिक करत आहे.
आता सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी १०० टक्के वॉक इन लसीकरण होईल. तिस-या लाटेला थोपविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केंद्राने राज्याला लसीचा पुरवठा करावा. राज्य लस महापालिकेला देईल, असे आम्ही म्हणत आहोत. सोमवारपासून मुंबईकरांना मोफत लस देणार आहोत. तिसरी लाट ही भयानक ठरू शकते. लसीकरणाला ब्रेक लागला असला तरी आता अडचण येणार नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे लांबून लोक येतात. कोरोनाचे संकट मुंबईत कमी झाले आहे पण संपले नाहीत. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होते आहे. पण धोका कायम आहे. महापालिका आपली यंत्रणा नीट राबवित आहोत. दुसरी लाट थोपविली आहे. पण लाट संपली नाही. तिचा परिणाम कायम आहे. आता जी लाट येईल ती दुप्पट किंवा तिप्पट असेल, असे तज्ज्ञ म्हणत आहेत. मात्र आपण सयंम बाळगला पाहिजे.
पंतप्रधान वेळेवर लस देतील, अशी अपेक्षा आहे. मतदार म्हणण्यापेक्षा नागरिकांना विनंती आहे की हा शत्रू दिसत नाही. कारण कोरोनाचा धोका कायम आहे. आपले कौतुक झाले की जबाबदारी वाढते. त्यामुळे जबाबदारीचे भान आम्हाला आहे. हे भान ठेवून आम्ही काम करत आहोत, असे महापौर म्हणाल्या.