मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असूनही शासनाला याबाबत अपयश येत असल्याचे दर्शवित महाराष्ट्राची हेतुपुरस्सर बदनामी केली जात आहे, अशी तीव्र भावना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी व्यक्त झाली.
या बदनामीसंदर्भात बहुतेक मंत्र्यांचा रोख हा केंद्र सरकार आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांवर होता. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूमध्ये निवडणुका आहेत तरी तेथे कोरोना वाढत नाही आणि आपल्याकडेच तो का वाढत आहे, अशी विचारणा मंत्र्यांनी केली. राज्यात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत. लसीकरणातही आपण आघाडीवर आहोत, इतर राज्यांची तर काही आकडेवारीदेखील समोर येत नाही असे असताना महाराष्ट्र सरकार काहीच पावले उचलत नसल्याचे भासविले जात आहे. केंद्रीय पथकाला चारचार वेळा राज्यात पाठवून दरवेळी शासनाच्या उणिवांवर बोट ठेवण्याचे उद्योग केले जात आहेत. महाराष्ट्राची मुद्दाम बदनामी करण्याचा तर या मागे हेतू नाही ना, काही राजकारण तर नाही ना असा सवाल ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच यशोमती ठाकूर, अस्लम शेख या मंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर म्हणाले की, राज्य शासन कोणत्याही दृष्टीने कमी पडलेले नाही. संकट वाढत आहे तशी यंत्रणाही वाढविली जात आहे. महाराष्ट्रातच केसेस का वाढत आहेत हे आपण केंद्रीय पथकाला विचारले पण त्यांच्याकडेही समाधानकारक उत्तर नव्हते. इतिहासात जेव्हा साथीचे रोग आले तेव्हा देशाच्या पश्चिमी भागात प्रादुर्भाव अधिक होता असा पूर्वानुभव पथकाने सांगितला.