मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 29,689 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 415 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,21,382 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत आहे. मात्र याच दरम्यान धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना आता मुंबईत घडली आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही संसर्ग झाला आहे. एका डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबईच्या एका डॉक्टरला लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे. मुलुंडमध्ये राहणाऱ्या डॉक्टर सृष्टी हलारी यांनी जून 2020 पासून आता तिसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लसीकरणानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याने यावर सध्या संशोधन सुरू आहे. यासाठी डॉक्टर सृष्टी यांचं स्वॅब सँपल घेण्यात आलं आहे. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांचं सँपल घेण्यात आलं असून लसीकरणानंतर देखील कोरोनाचा संसर्ग कसा झाला याचा तपास करण्यात येणार आहे. पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये काम करताना सृष्टी यांना 17 जून 2020 रोजी सर्वप्रथम कोरोनाची लागण झाली होती.
पहिल्यांदा लागण झाल्यानंतर डॉक्टरांना पुन्हा 29 मे रोजी दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आणि आता पुन्हा एकदा 11 जुलै रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. "माझा एक सहकारी संक्रमित असल्याने पहिल्यांदा मला कोरोनाची लागण झाली होती. मी माझी पोस्टिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या घरी परतली. त्यानंतर जुलैमध्ये वडील, भाऊ यांच्यासह संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडलं" अशी माहिती डॉक्टर सृष्टी यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयीच्या आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमधून याबाबत दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर रुग्णांमध्ये न्यूरोल़ॉजिकल समस्यांचा अधिक घातक स्वरूपात वाढत असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील मूलचंद रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यात ब्रेन हॅमरेज आणि अनेक गंभीर समस्या वाढत आहेत. डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रुग्णालयातील सीनियर न्यूरोसर्जन डॉ. आशा बक्शी यांनी 37 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी सारखी लक्षणं दिसून येत आहेत. तर 26 टक्के रुग्णांमध्ये चव समजत नसल्याचं समोर आलं आहे.