मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,94,720 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 442 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 4,868 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 16,420 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 14,649 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईचा रिकव्हरी रेट हा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आज 46 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
देशभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ काँन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. ओमायक्रॉनची धास्ती, लसीकरण मोहीम आणि करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या या आढावा बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ आहे. यासाठी राज्य सरकारकडून निर्बंधांसह अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांचा आणि एकंदरीतच देशातील परिस्थतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये देशभरातील 30 मुख्यमंत्री सामील होणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सामील होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.