Coronavirus: कर्जाचा हप्ता चुकविणे पडू शकेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:54 AM2020-04-03T01:54:33+5:302020-04-03T01:54:38+5:30
कर्ज हप्त्यांच्या स्थगितीचा लाभ ग्राहकांना कसा द्यायचा, यावर बहुतांश बँका अजून काम करीत आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तीन महिने कर्जाचे हप्ते वसूल करू नयेत, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना दिल्या असल्या तरी क्रेडिट कार्डावरील कर्जे आणि वैयक्तिक कर्जे (पर्सनल लोन) यांचे हप्ते लांबणीवर टाकणे ग्राहकांना महागात पडणार आहे. कारण या कर्जांचा हप्ता थकल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जाते.
कर्ज हप्त्यांच्या स्थगितीचा लाभ ग्राहकांना कसा द्यायचा, यावर बहुतांश बँका अजून काम करीत आहेत. तथापि, या क्षेत्रातील जाणकारांनी हप्ते न थकविण्याचा सल्ला दिला आहे. आरबीएल बँकेने सांगितले की, हप्त्यांना देण्यात आलेली स्थगिती सर्व प्रकारच्या कार्डावरील थकीत रकमेलाही लागू आहे; पण या कर्जाचा भरणा थकल्यास मुद्दलप्रमाणेच थकीत व्याजावरही वेगळे व्याज लागेल. त्यामुळे ग्राहकांनी भरणा लांबणीवर टाकण्यापेक्षा शक्यतो भरणा करण्याचा प्रयत्न करावा आणि चक्रवाढ व्याज टाळावे.
सूत्रांनी सांगितले की, गृहकर्जासारख्या सरळ व्याजावरील कर्जाचे हप्ते थकल्यास फारसे बिघडण्यासारखे नाही. या कर्जांचे व्याजदरही तसेच कमीच असतात. क्रेडिट कार्ड आणि असुरक्षित वैयक्तिक कर्जांचे तसे नाही. यातील अनेक कर्जांचा वार्षिक व्याजदर ४० टक्क्यांपर्यंत आहे.
क्रेडिट कार्ड बिल व्यवस्थापन संस्था ‘क्रेड’ने एका ग्राहकाला दिलेल्या हिशेबानुसार, एक लाखाची थकबाकी असलेल्या ग्राहकाने मे अखेरपर्यंत भरणा न केल्यास जूनमध्ये त्याला १,१५,००० रुपये भरावे लागतील. यात एक लाख रुपये मुद्दल आणि १५ हजार रुपयांचे व्याज असेल.
जाणकारांनी सांगितले की, केंद्रीय बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हप्ते लांबणीवर टाकण्याच्या सवलतीत फक्त मुद्दल रकमेचा समावेश आहे. व्याजाचा समावेश त्यात नाही. त्यामुळे थकीत व्याजावर पुन्हा व्याज लावण्याचा बँकांसमोरील पर्याय खुलाच आहे. हप्ते सवलत संपल्यानंतर ग्राहकांवर मोठे ओझे येऊ शकते.