CoronaVirus News: ...आणि रेल्वे स्थानके पुन्हा गजबजली; ८४ दिवसांनी चाकरमान्यांचा लोकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:48 AM2020-06-16T05:48:17+5:302020-06-16T05:48:33+5:30

सोमवारपासून लोकल सुरू होणार याची कुणकुण रविवारी सकाळीच लागली होती

CoronaVirus local train starts in mumbai after 84 days | CoronaVirus News: ...आणि रेल्वे स्थानके पुन्हा गजबजली; ८४ दिवसांनी चाकरमान्यांचा लोकल प्रवास

CoronaVirus News: ...आणि रेल्वे स्थानके पुन्हा गजबजली; ८४ दिवसांनी चाकरमान्यांचा लोकल प्रवास

Next

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यापासून बंद झालेली मुंबईची लोकल सोमवारी मर्यादित स्वरूपात सुरू झाली आणि मुंबईच्या आर्थिक गाड्याचा सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ पुन्हा गजबजला.

सोमवारपासून लोकल सुरू होणार याची कुणकुण रविवारी सकाळीच लागली होती. पण रेल्वेच्या शिरस्त्याप्रमाणे त्याबद्दलचा अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत चाकरमानी पुन्हा बसच्या रांगांची भीतीदायक स्वप्ने पाहत झोपी गेला होता. तिन्ही रेल्वे मार्गांवर किती फेऱ्या, कोणाला प्रवेश, तिकीट-पासचे काय, फिजिकल डिस्टन्सिंगचे काय हे रेल्वेने जाहीर केले.

काही सजग लोकल प्रवासी स्टेशनवर जाऊन तर बघू या वर्षपरंपरागत अनुभवाच्या जोरावर बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, कुर्ला, दादर, डहाणू, विरार, वसई, भाईंदर, बोरीवली, अंधेरी, वांद्रे या हुकमी स्थानकांवर गेले. त्यांना राज्य सरकारने रेल्वेला दिलेल्या यादीतील संस्थेच्या ओळखपत्रावर तिकीट मिळाले. काहींना पासच्या मुदतीला वाढीव काळ मिळाला. ...आणि मग जे दृश्य पाहिल्याशिवाय चाकरमान्यांचा दिवस सुरू होत नाही ती घटना घडली... पांढरी-पिवळी लोकल धडधडत आली... प्लॅटफॉर्मवर घोषणा झाली... धाकधूक करत प्रवासी गाडीत चढले आणि पुरेसे अंतर ठेवून जागा पटकावल्या गेल्या. गोंधळ, घाई होतीच, पण त्या सोबतीला होते मास्क आणि वेगवेगळ्या सॅनिटायझरचे सुवास.

जलद गाडी असल्याने इतर स्थानकांवर उभे असलेले मोजके प्रवासी वेगाने जाणाऱ्या गाडीकडे केवळ पाहत होते... हळहळत होते.
सकाळपेक्षा संध्याकाळी परतीच्या प्रवासाला चित्र वेगळे होते. लोकल सुरू झाल्याची माहिती आणि ताजा अनुभव एव्हाना कार्यालयातील सर्वाधिक चर्चेचा विषय होता. त्यामुळे संध्याकाळी गर्दी वाढलेली होती.

लोकलची गर्दी, जीवघेणा प्रवास, उशिरा धावणाºया गाड्या हे सगळे असले तरी लोकल हा नोकरदारांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोरोनामुळे तोच दुरावला होता. ती लोकल आज पुन्हा भेटली... याचा आनंद पट्टीच्या मुंबईकरांएवढा कोणाला होणार?

मीडियाला का वगळले?
कोरोनाच्या लढाईत माहितीचा हक्काचा स्रोत असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींना मात्र लोकल प्रवासातून वगळले आहे. त्याबद्दल रेल्वेने स्पष्ट माहिती दिली नाही. मात्र, राज्य सरकारने दिलेल्या यादीनुसारच प्रवाशांना प्रवास करता येईल, असे स्पष्ट केले. या यादीत राज्य सरकारी कर्मचारी, पालिका कर्मचारी, पोलीस, बेस्ट कर्मचारी, वीज कंपन्यांचे कर्मचारी, खासगी आणि सरकारी हॉस्पिटलचे कर्मचारी यांचाच समावेश आहे.

Web Title: CoronaVirus local train starts in mumbai after 84 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.