CoronaVirus : ४ लाख ६५ हजार घरांचे बांधकाम लॉकडाउन; मुंबई महानगर क्षेत्राला सर्वाधिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:03 AM2020-03-27T01:03:15+5:302020-03-27T05:53:22+5:30
Coronavirus : २०१३ ते २०१९ या कालावधीत या १५ लाख ६२ हजार घरांच्या बांधकामास सुरुवात झाली होती. त्यापैकी रेराकडे नोंदणीकृत असलेल्या महाराष्ट्रातील एकूण गृहप्रकल्पांची संख्या २३ हजार २३७ इतकी आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल ४ लाख ६५ हजार घरांचे बांधकाम बंद करावे लागले आहे. देशभरातील गृहनिर्माण प्रकल्पांतील अशा या घरांचा आकडा तब्बल १५ लाख ६२ हजार इतका आहे. त्यापैकी सर्वाधिक ३० टक्के घरे ही एमएमआरमध्ये आहेत.
२०१३ ते २०१९ या कालावधीत या १५ लाख ६२ हजार घरांच्या बांधकामास सुरुवात झाली होती. त्यापैकी रेराकडे नोंदणीकृत असलेल्या महाराष्ट्रातील एकूण गृहप्रकल्पांची संख्या २३ हजार २३७ इतकी आहे. पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रकल्पांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करणे अशक्य झाले होते. त्यातच कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे सर्वच प्रकारचे बांधकाम बंद करावे लागले आहे. दिल्ली आणि सभोवतालच्या (एनसीआर) परिसरात बांधकाम सुरूअसलेल्या अशा घरांची संख्या ४ लाख २४ हजार इतकी आहे.
तर, पुणे परिसरातील घरांची संख्या २ लाख २६ हजार आहे. बंगळुरू (दोन लाख), कोलकाता (९० हजार), तर चेन्नई, हैदराबाद येथे १ लाख १८ हजार घरांच्या निर्मितीचे काम बंद पडले आहे.
नवीन प्रकल्प ६ महिने लांबणीवर
एप्रिल आणि मे महिन्यांत अनेक विकासकांनी आपल्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प केव्हा सुरू होतील याची माहिती सध्या कुणालाही देता येणार नाही.
मात्र, सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील आर्थिक संकट लक्षात घेता किमान सहा महिने तरी नव्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्याची हिंमत विकासक दाखविणार नाहीत, असे सांगितले जाते. ं
चार लाख कोटींची घरे
मुंबई महानगर क्षेत्रातील बांधकाम सुरू असलेल्या घरांचे मूल्य तब्बल २ लाख, ८ लाख कोटींच्या घरात जाणारे आहे. त्याशिवाय याच भागातील १ लाख ८० हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून ती खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे मूल्यही सुमारे सव्वालाख कोटींच्या घरात असल्याची माहिती या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सल्लागार संस्थांच्या प्रतिनिधींकडून हाती आली आहे.