CoronaVirus Lockdown : बोरीवलीत अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह बापाने खांद्यावरून नेला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 06:08 PM2020-03-29T18:08:03+5:302020-03-29T18:11:37+5:30
CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनदरम्यान कुठे एकुलत्या एक मुलास आईस मुखाग्नी देता आला नाही तर कुठे पत्नीवर पतीने गर्दी न जमवता अंत्यसंस्कार केले.
मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. या लॉकडाऊनदरम्यान कुठे एकुलत्या एक मुलास आईस मुखाग्नी देता आला नाही तर कुठे पत्नीवर पतीने गर्दी न जमवता अंत्यसंस्कार केले. असे असताना बोरीवली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बोरीवली येथील गणपत पाटील नगरात एका अडीच वर्षाच्या चिमुकलीचा अचानक आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या पालकांनी देशहित जपत चक्क खांद्यावरून आपल्या चिमुकलीचा मृत शरीर मोजक्या नातेवाईकांसह सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत स्मशानभूमीपर्यंत नेला आहे. जे बेजबाबदार कामाशिवाय घराबाहेर पडतात त्यांनी या घटनेवरून धडा घेणं खूप गरजेचं आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही चिमुकली आजारी होती. दोन वर्षे तीन महिने वय या चिमुकलीचे होते. या चिमुकलीची महापालिकेच्या डॉक्टरांकडे उपचार सुरु होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली होती. सुदैवाने तशी कोणतीच लक्षणे आढळली नव्हती. मात्र दुर्दैवाने या आजारपणामुळे चिमुकलीचा काल सकाळी मृत्यू झाला. पोटची चिमुकली जिने जग देखील नीट पहिले नव्हते तिला गमावल्याने आई-वडिलांसाठी हे डोंगराएवढे दुःख झाले होते. मात्र, या खूप मोठ्या दु:खातही त्या पालकांनी सामाजिक भान, देशहित जपत गर्दी न करण्याचा निर्णय घेतला.
करोनाच्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या कर्फ्यू लागू करण्यात आलेली आहे. तसेच गर्दी करू नका, तातडीच्या कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नका असे वारंवार सरकारकडून सांगण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन मृत चिमुकलीच्या पालकांनी घरातील व शेजारच्या अवघ्या १० जणांसह स्मशानभूमीत जाऊन या चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले. वडिलांनी आपल्या चिमुकलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन स्मशानभूमीपर्यंत नेले. पोलिसांना या मुलीच्या मृत्यूबद्दल माहिती मिळाल्यानंतर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, कुटुंबीयांनी अॅम्ब्युलन्स घेण्यास नकार दिला. याबाबत सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडीओ वायरल झाला होता.