मुंबई : कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. टप्याटप्याने त्यात सूट दिली जात असली तरी महाराष्ट्रात मात्र प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे महानगर परिसरासह राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे ३ मे नंतर देशभरातील लॉकडाउन मागे घेतला तरी राज्यातील लॉकडाउन वाढण्याची शक्यता आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री नव्या सवलती जारी करण्यात आल्या. यात नागरी भागातील दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. यापूर्वी २० एप्रिलला काही सवलती लागू झाल्या होत्या. मात्र त्याची मुंबई, पुणे परिसरात अंमलबजावणी करता आली नाही. आताही दुकाने उघडी ठेवण्याबाबतचा संभ्रम कायम आहे. राज्य सरकारकडून याबाबत निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे ३ मे नंतरही महाराष्ट्रात लॉकडाउन चालूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्यात १८ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात येणार असल्याचे वृत्त शनिवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हवाल्याने देण्यात येत होते. मात्र स्वत: टोपे यांनी याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. कोरोना संक्रमितांची संख्या थांबविणे आवश्यक आहे. सध्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. सर्व प्रतिबंधित क्षेत्र पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. यासोबतच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच वेग मंदावला आहे. हा दर तीन दिवसांवरुन सातवर गेला आहे. राज्यात देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात एक लाखाहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहेत. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नाही. त्यामुळे राज्यातील दुकाने उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी सीमा बंद करुन काही महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे.लॉकडाउनच्या नियमात कोणतेच बदल केले जाणार नाही, ३ मे पर्यंत स्थिती जैसे थे असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नव्या निर्णयावर राज्याने अद्याप कोणता निर्णय घेतलेला नाही. मात्र, यापुढे लॉकडाउनच्या नियमात कोणतीही सूट दिली जाणार नाही. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. त्यात पुढील कार्यवाहीबाबत अधिक स्पष्टता होईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
CoronaVirus : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 3:01 AM