मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला नसला तरी मुंबई आणि पुण्यात कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून राज्य सरकार आधीच सावध झाले असून, मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊन पुढच्या काही काळापर्यंत अजून वाढवण्याच्या निर्णयापर्यंत सरकार आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूणच रोज वाढत चाललेले कोरोनाचे रुग्ण, तसेच केंद्रीय पथकाने दिलेली कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीची चिंता वाढवणारी आकडेवारी विचारात घेऊन राज्यातील लॉकडाऊन वाढवावा का, असा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाला आहे.
कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीची समीक्षा करण्यासाठी 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, पुण्याबाबत काय भूमिका घेतात आणि केंद्राकडून त्याला काय प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग आजही कायम राहिला. राज्यात आज एकूण ४३१ रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६४९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात राज्यामध्ये 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.