Join us

CoronaVirus: मुंबईत खरंच लॉकडाऊन सुरू आहे का?; 'हे' फोटो पाहून राज्य सरकारने उत्तर द्यावं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 2:48 PM

देशात 17,266 कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक 4204 केसेस महाराष्ट्रातील आहेत. काल दिवसभरात मुंबईत 456 नवे रुग्ण आढळून आले होते.

ठळक मुद्देदेशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालीय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये लॉकडाऊनचं अत्यंत काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे.गोरेगावजवळ आणि ऐरोली टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळालं.

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी नागरिकांनी घरातच राहणं आवश्यक असल्यानं, देशामध्ये 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालीय. त्यामुळे इथे या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी होणं अत्यावश्यक आहे. मात्र, आज सकाळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगावजवळ आणि ऐरोली टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. 20 एप्रिलपासून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊन काहीसा शिथील करण्यात आलाय. परंतु, त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई येत नाही. असं असतानाही, एवढे लोक का, कसे घराबाहेर पडले आणि त्यांना स्थानिक प्रशासन-यंत्रणा रोखू कशा शकल्या नाहीत, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय.  

आज सकाळी 10 वाजता प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, देशात 17,266 कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक 4204 केसेस महाराष्ट्रातील आहेत. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 2724 (बरे झालेले 304 रुग्ण धरून) इतकी आहे. काल दिवसभरात मुंबईत 456 नवे रुग्ण आढळून आले होते. यावरून, मुंबईतील स्थिती किती संवेदनशील आहे, याची कल्पना येते. अशा परिस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये लॉकडाऊनचं अत्यंत काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे. घरात राहणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे आणि त्यांना तातडीच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू न देणं, ही पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, आज सकाळी हायवेवर दिसलेलं चित्र काळजीत भर घालणारंच आहे.

कोणत्या भागांना लॉकडाऊनच्या नियमावलीतून सवलत देण्यात आलीय, याची नेमकी माहिती न पोहोचल्यानं एवढे लोक बाहेर पडले का?,ते नेमके कोण होते?, त्यांना पोलिसांनी रोखलं का?, माघारी पाठवलं का?, हे लोक कुठे गेले?, त्याचे काय परिणाम होऊ शकतात?, या प्रश्नांची उत्तरं शोधणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

इंधन विक्री आणि वाहतूक, ५० टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटीसंबंधित सेवा, कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स या गोष्टी ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नोकरदार मंडळी बाहेर पडली असावीत, अशी शक्यता आहे. टोलनाक्यांवर लेन असल्यानं तिथे ही गर्दी प्रकर्षाने जाणवली.  

 हॉटस्पॉट असलेले जिल्हे

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलङाणा, नाशिक, कोल्हापूर, अमरावती आणि पालघर जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट आहेत. तर, हॉटस्पॉट नसलेल्या जिल्ह्यांत अकोला, लातुर, सातारा, रत्नागिरी उस्मामानाबाद, जळगाव, सिंधुदूर्ग, रायगड, बीड, हिंगोली, जालना, वाशिम, धुळे, सोलापूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथे कोरोना हॉटस्पॉट नसले तरी एखाद दुसरे अथवा तुरळक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यात अजिबातच कोरोनाचे रूग्ण आढळून आले नाहीत त्यांचा ग्रीन झोनमध्ये समावेश केला आहे.   

 ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये आजपासून या सेवा सुरू

शेती : शेतीविषयक कामे, शेती व बागायती कामांसाठी साहित्याची विक्री व उत्पादन, कृषिमाल खरेदी केंद्रे,

मत्स्य व्यवसाय, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री, पोल्ट्री फार्म, हॅचरीज, पशुखाद्य निर्मिती प्रकल्प

बँकिंग आणि पतपुरवठा

बँक शाखा आणि एटीएम, कॅश मॅनेजमेंट एजन्सिज, इन्शुरन्स कंपनी, सहकारी पतसंस्था.

मनरेगा : सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मजुरांना ही कामे करता येतील.

जीवनावश्यक वस्तूंची विक्री, वाहतूक आणि साठवणूक. दुकाने उघडण्याची किंवा बंद करण्याच्या वेळेचे कोणतेही बंधन नाही.

गॅरेज व धाबे

ट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरू करण्यास परवानगी

इंधन विक्री आणि वाहतूक

पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन व गॅसची वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्री

पोस्टल, कुरिअर सेवा, दूरध्वनी, इंटरनेट सेवा

ब्रॉडकास्टिंग, डीटूएच आणि केबल सेवा

५० टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटीसंबंधित सेवा

कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे