मुंबई – संपूर्ण देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये असं वारंवार प्रशासनाकडून लोकांना आवाहन केले जात आहे. कोरोनाशी युद्ध जिंकण्यासाठी सहकार्य करा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं सांगूनही काही लोक ऐकत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा महाभागांना शिक्षा केल्याचंही दिसून आलं.
मात्र काही ठिकाणी पोलिसांवर जमावाने हल्ला करणे, लॉकडाऊनचं पालन करण्यास सांगितल्याने मारहाण करणे असे धक्कादायक प्रकार घडत आहे. राज्यातही गोवंडी, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद याठिकाणी पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार घडले. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असतील तर राज्यात कायद्याचं राज्य उरलंय का? असा प्रश्न निर्माण होतो. लोक जर पोलिसांवर हल्ले करत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे असं मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.
याबाबत त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, औरंगाबाद आणि पिंपरी येथील घटनांमुळे पोलिसांचं मनोधैर्य जर खचलं तर आजच्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ते परवडणारं नाही. पोलिसांवर हात उगारणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कोणत्याही धर्माचा-समाजाचा असेना, गृहमंत्र्यांनी असा धडा शिकवावा की, पुन्ही तशी चूक करण्याची हिंमत कुणीही करणार नाही असं शालिनी ठाकरे यांनी मागणी केली आहे.
दरम्यान, पिंपरीमध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जमावबंदी व संचारबंदी आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी काळेवाडी येथे विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना हटकले. या कारणावरून आरोपी यांनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपी युनूस अत्तार याने व त्याच्या दोन्ही मुलांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या हातातील काठी हिसकावण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांना मारहाण केलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला.