मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी शनिवारसह रविवारी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशीच्या लाॅकडाऊनला मुंबईकरांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. शनिवार सकाळपासून रात्रीपर्यंत दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मुंबईत शुकशुकाट होता. छोट्या आणि मोठ्या बाजारपेठांसह बहुतांश सर्वच दुकाने दिवसभर बंद होती. काही ठिकाणी दुकानांचे शटर अर्धे खुले ठेवून व्यवहार होत असले तरी हे प्रमाण कमी होते.कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ही साखळी तोडण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी मुंबईकरांनी एकत्र येणे, फिरणे, घराबाहेर पडणे टाळले. लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीपासूनच झाली होती. शुक्रवारी रात्री आठनंतर मुंबईचे रस्ते ओसाड हाेऊ लागले आणि शनिवारची पहाट उजाडल्यानंतर यात भरच पडली. काही सोसायटी अथवा रहिवासी क्षेत्रात काही दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र हे प्रमाण तुलनेने फारच कमी होते. अगदीच दूध, अंडी किंवा इतर महत्त्वाचे साहित्य घेण्यासाठी किराणा दुकानांकडे नागरिक फिरकत होते.दादर येथील मार्केटमध्ये सकाळी काही प्रमाणात गर्दी हाेती. मात्र दक्षिण मुंबईतील मनीष मार्केटसह मस्जिद बंदर येथील बहुतांश दुकाने बंद होती. मनीष मार्केटसारखे मोठे मार्केटच बंद असल्याने दक्षिण मुंबईतील परिसरात शुकशुकाट होता. मनीष मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी सकाळपासून येथील व्यापार, व्यवहार ठप्प आहे. दुकाने सकाळपासून बंद आहेत. अशीच परिस्थिती मस्जिद बंदर येथील बाजारपेठांत होती. मात्र येथे थोडी रहदारी हाेती.गिरगाव येथील रहिवासी क्षेत्रातही दुकाने पूर्णत: बंद होती. काही व्यवहार शटर अर्धे ठेवून सुरू होते. मात्र हे प्रमाण कमी होते. दादर येथे सकाळी वर्दळ असली तरी नंतर मात्र येथील गर्दी कमी झाली. मुंबईमधील सर्वच प्रमुख रस्त्यांवर गर्दी नव्हती. रोजच्या तुलनेत शनिवारी धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी होते. शिवाय एस.टी., बेस्ट बससह रिक्षा आणि टॅक्सीही कमी प्रमाणात रस्त्यांवर उतरल्या होत्या. सकाळी ही रहदारी काहीशी वेगाने सुरू असली तरी दुपारनंतर ती कमी झाली. रेल्वे प्रवासातही बरेच कमी प्रवासी असल्याचे चित्र हाेते.
...अन् मुंबईकर थांबले- दक्षिण मुंबईतील मनीष मार्केटसह मस्जिद बंदरची बहुतांश दुकाने बंद - गिरगाव हिवासी क्षेत्रातही दुकाने बंद. काही व्यवहार शटर अर्धे ठेवून सुरू होते. मात्र हे प्रमाण कमी. - दादर येथे सकाळी वर्दळ, नंतर गर्दी झाली कमी. सर्व दुकाने बंद.- लालबाग, लोअर परेल, परळ, वरळी, प्रभादेवी या मराठमोळ्या परिसरांत शुकशुकाट. - माटुंगा, माहीम, वांद्रे परिसरांतही गर्दीचे प्रमाण कमी. सायन, कुर्ला, घाटकोपर परिसरांत सर्वत्र बाजारपेठा बंद. रस्ते निर्मनुष्य. - सांताक्रूझ, अंधेरी, साकीनाका, विलेपार्ले, अंधेरी तसेच घाटकोपर, मुलुंडपर्यंत आणि पश्चिम उपनगरांत मालाडपर्यंत सर्वत्र सामसूम.- मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग, कुर्ला-अंधेरी रोडसह मुंबईमधील सर्वच प्रमुख रस्ते निर्मनुष्य. - रस्त्यावर १० ते १५ टक्के वाहतूक हाेती. लाेकललाही नेहमीच्या तुलनेत विशेष गर्दी नव्हती.