Join us

CoronaVirus Lockdown News: निर्बंधाबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम; कुठे पाेलिसांशी हुज्जत, तर कुठे विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:47 AM

सकाळी अनेकांनी उघडली दुकाने; पाेलिसांच्या कारवाईनंतर दुपारनंतर शटर बंद!

मुंबई :  मिनी लॉकडाऊनबाबत मंगळवारी दुकानदारांमध्ये संभ्रम पहायला मिळाला. सकाळच्या सत्रात बऱ्याच ठिकाणी दुकाने सुरू होती. पोलिसांनी त्यांना नियमावली समजावून शटर बंद करण्यास भाग पाडले. यावेळी कुठे पोलिसांसोबत हुज्जत घालण्यात आली, तर कुठे विरोध करण्यात आल्याचे चित्र हाेते.राज्य सरकारच्या नियमावलीनुसार,  सोमवार ते शुक्रवारपर्यंत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदीचे आदेश लागू आहेत. यात, वीकेंडला पूर्णत: लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान, या संचारबंदी आणि जमावबंदी आदेशातून अत्यावश्यक सेवा आणि त्यातील कर्मचारी, अन्नपदार्थ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, बेकरी, दूध विक्रेते, रुग्णालये, मेडिकल आणि अन्य अत्यावश्यक सेवांना वगळले आहे. याव्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश असल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.रस्त्याकडेला असलेल्या हॉटेल तसेच खाद्यपदार्थांच्या टपरीवर थांबून खाता येणार नाही. तेथूनही फक्त पार्सल सेवा सुरू राहणार असल्याचेही नगराळे यांनी नमूद केले. त्यानुसार, सोमवारी रात्रीपासून ठिकठिकाणी पोलिसांकड़ून कारवाईला सुरुवात झाली; मात्र नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला.काही ठिकाणी वीकेंडला लॉकडाऊन असल्यामुळे तेव्हाच दुकाने बंद करायची आहेत, असा सूर हाेता. त्यात पोलिसांनी शटर बंद करण्यास सांगितल्यानंतर बरीच मंडळी दुकानाबाहेर ठाण मांडून बसली. यामुळे  पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये कुठे हुज्जत झाली तर कुठे वादाला तोंड द्यावे लागले. आधीच काही दिवस दादरमध्ये काही दुकानदारांनी दुकानाबाहेर फलक लावून निर्बंधांचा विरोध केला आहे. पोलिसांकड़ून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.पाेलिसांची पाठ फिरताच पुन्हा उघडली दुकानेमंगळवाऱी सकाळी दुकानदारांनी नेहमीप्रमाणे दुकाने उघडली. यात नियमांबाबत माहिती असलेल्यांचाही समावेश होता. पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त घालून त्यांना नियमावली समजावून सांगितली; मात्र काही ठिकाणी दुकानदार दुकाने बंद करण्यास तयार नव्हते. पोलीस गेल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी दुकाने उघडण्यात आली. त्यांना पर्यायी कायदेशीर कारवाईचा धाक दाखवल्यानंतर दुपारपर्यंत दुकानाचे शटर बंद होण्यास सुरुवात झाली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या