CoronaVirus Lockdown News: निर्बंधांबाबत व्यापारी, दुकानदारांत गोंधळ; पुरेशा माहितीचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:58+5:302021-04-06T07:14:16+5:30
महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने सोप्या भाषेत नियमावली जारी केली असली तरी बाजारपेठांतील बहुतांशी घटकांकडे याबाबत पुरेशी माहिती नसल्याने गोंधळात भर पडत आहे.
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी रात्री ८ पासून नव्याने जारी केलेल्या निर्बंधांना व्यापारी वर्गासह दुकानदारांमधून विरोध होत असून, जारी करण्यात आलेल्या नियमांमुळे प्रचंड नुकसान होणार आहे, असे म्हणणे व्यापारी आणि दुकानदारांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने सोप्या भाषेत नियमावली जारी केली असली तरी बाजारपेठांतील बहुतांशी घटकांकडे याबाबत पुरेशी माहिती नसल्याने गोंधळात भर पडत आहे.
दक्षिण मुंबईतील कॉफ्रेड मार्केट, मस्जिद बंदर येथील बाजारपेठा, गिरगाव येथील बाजारपेठा, झवेरी बाजारसह मोठ्या बाजारपेठांमध्ये नव्या नियमांमुळे अक्षरश: गोंधळ निर्माण झाला आहे. मुळात दुकानेच बंद ठेवावी लागणार असल्याने जे नुकसान होणार आहे ते कोण भरून देणार, असा सवाल व्यापारी आणि दुकानदारांनी केला आहे.
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली परिसरात मोठ्या बाजारपेठा आहेत. लालबागसह उर्वरित ठिकाणी मोठ्या बाजारपेठा आहेत. येथील दुकानदार आणि व्यापारी वर्गाने याबाबत नाराजी व्यक्त करून रोष व्यक्त केला आहे. व्यापार बंद ठेवल्याने होणारे नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दाद मागणार
या गोंधळाबाबत आता व्यापारी मंडळांकडून सरकारच्या भेटीदेखील घेण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपला निषेध नोंदविण्यात येणार आहे. हे सगळे शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यापारी मंडळाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली.